खड्डे आणि पावसाने रोखली वाहनांची वाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai
खड्डे आणि पावसाने रोखली वाहनांची वाट

खड्डे आणि पावसाने रोखली वाहनांची वाट

ठाणे : गेल्या अनेक दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसाने मागील तीन ते चार दिवसांपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठाण्यातील अंतर्गत रस्त्यांसह मुख्य मार्गावरदेखील खड्ड्यांचे साम्राज्य पसरत आहे. मंगळवारी सकाळपासूनच ठाण्यात पावसाची संततधार सुरू असल्याने त्याचा फटका चाकरमान्यांना बसल्याचे दिसून आले. शहरातील मुख्य मार्गांसह अंतर्गत मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने त्याचा फटका शाळेच्या बसगाड्या, टीएमटी, एसटीला बसला. अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर प्रवास करण्‍यासाठी वाहनचालकांना अर्धा ते पाऊण तास लागत होता. मंगळवारी सकाळी टीएमटीच्या बस वाहतूक कोंडीत अडकल्याने सॅटिस पुलावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना वेळेत रिक्षा उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता न आल्याने लेटमार्क लागले.

मंगळवारीही सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग, महामार्ग तसेच अंतर्गत मार्गावर खड्डे पडले होते. त्यात अवजड वाहनांचाही भार शहरात वाढला होता. त्यामुळे संपूर्ण शहरात वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले होते. शहरातील मुंबई नाशिक महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे बेलापूर मार्ग या मुख्य मार्गांसह अंतर्गत मार्गावरील कोर्टनाका, टेंभीनाका, ज्ञानेश्वरनगर, नितीन कंपनी भागात वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल आणि खारेगाव पूलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे साकेत पूल ते घोडबंदर येथील आर मॉलपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती; तर भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गावर खारेगाव ते मानकोलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. ठाणे-बेलापूर मार्गावरही कळवा, विटावा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे बेलापूरमार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना कोंडीत अडकावे लागले. पूर्व द्रुतगती महामार्ग मुंबईच्या दिशेने वाहूतक करणाऱ्या मार्गावर कोपरी पूल अरुंद असल्याने कोपरी पूल ते नितीन कंपनीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या मार्गावर अनेक रुग्णवाहिकाही अडकून होत्या.

स्‍कूल बसनाही फटका

शहरातील अंतर्गत मार्गावरील लोकमान्यनगर, यशोधननगर, वागळे इस्टेट, कोर्टनाका, टेंभीनाका, गोकुळनगर भागात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमध्ये शाळेच्या बसगाड्या, टीएमटीच्या बसगाड्या अडकून होत्या. रिक्षा, बस थांब्यांवर प्रवाशांना वेळेत रिक्षा, बसगाड्या उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.
नोकरदारांना लेटमार्क

मंगळवारी सकाळीच्या वेळी टीएमटीच्या बसेस वाहतूक कोंडीत अडकल्याने त्याचा परिणाम परिवहनच्या वेळापत्रकावरदेखील झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मंगळवारी सकाळी सॅटिस पुलावर बसची वाट बघत तासन् तास रांगेत उभे राहावे लागले होते; तर दुसरीकडे वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना वेळेत रिक्षा उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता न आल्याने लेट मार्क लागल्याचे दिसून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96730 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..