नऊ महिन्यांच्या बाळाचे यशस्वी यकृत प्रत्यारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नऊ महिन्यांच्या बाळाचे यशस्वी यकृत प्रत्यारोपण
नऊ महिन्यांच्या बाळाचे यशस्वी यकृत प्रत्यारोपण

नऊ महिन्यांच्या बाळाचे यशस्वी यकृत प्रत्यारोपण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : जन्मजात पित्तनलिका नसलेल्या नऊ महिन्यांच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय वापरून यशस्वी उपचार करण्यात यश आले आहे. मुंबईतील नानावटी मॅक्स रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत बाळाला पुनर्जन्म दिला. वायू विसावदिया असे बाळाचे नाव असून नुकत्याच लग्न होऊन घरात आलेल्या त्याच्या काकीने आपल्या यकृताचा अंश दिल्याने डॉक्टरांना त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करता आली. जगातील अशा स्‍वरूपाची ती पाचवी यशस्वी शस्त्रक्रिया ठरली आहे.
वायू याला जन्मानंतर सफेद रंगाची विष्ठा व्हायची. तो जेव्हा सहा दिवसांचा होता, तेव्हा त्याला जन्मतःच बायलरी अॅट्रेसिया म्हणजे पित्तनलिका नसल्याचा क्वचित आढळणारा आजार असल्याचे निदान करण्यात आले. दोन आठवड्यांत त्याच्यावर आतडे यकृताला जोडण्याची (कसई पोर्टोएन्टेरोस्टोमी) शस्त्रक्रिया करण्यात आली; परंतु ती अयशस्वी झाल्यामुळे त्याला कावीळ, कोग्युलोपथी (रक्त न गोठण्यासह पातळ होणे), पोटात द्रव साचणे आणि वाढ न होणे अशासारखा यकृताचा गंभीर आजार झाला. वायूवर यकृत प्रत्यारोपण करण्याचा एकमेव पर्याय डॉक्‍टरांसमोर होता. त्याच्या काकीने यकृताचा भाग दिल्याने त्‍याच्‍यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. वायूने उपचारांना उत्तम प्रतिसाद दिला आणि १० दिवसांच्या आत त्याला डिस्चार्ज मिळाला. आता त्याची प्रकृती सुधारली असून त्याची दर तीन महिन्यांनी तपासणी करावी लागते. अशा प्रकारची जगातील पाचवी घटना असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

आई-वडील यकृतदानास अपात्र
वायूवर यकृत प्रत्यारोपण करण्याचा एकमेव पर्याय डॉक्‍टरांसमोर होता. वायूचे आई-वडील यकृतदान करण्यास अपात्र ठरल्याने त्याची काकी विधी विसावदिया यांनी पुढाकार घेतला. विधी महिनाभरापूर्वीच लग्न होऊन विसावदिया कुटुंबात आल्या होत्या. त्यांनी स्वेच्छेने आपल्या यकृताचा काही भाग दान केला. विधी यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह होता. वायूचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह होता. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमने एबीओआय यकृतारोपण करण्याचा निर्णय घेतला; मात्र दरम्‍यान वायूला न्यूमोनिया झाला आणि काकीमध्ये कोविडची लक्षणे होती. त्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्‍यानंतर नऊ महिन्यांच्या वायूमध्‍ये अ रक्तगटाविरुद्ध ॲण्टीबॉडीज तयार झाल्याचे आढळले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली.

नऊ महिन्यांच्या वयात एखादे बालक संवेदनशील झाल्याची अहवालात कोठेही नोंद नाही. पश्चिम भारतात प्रथमच डिसेन्सिटायझेशन प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला. त्यानंतर एका नऊ महिन्यांच्या बालकाची यशस्वी एबीओआय यकृतारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
- डॉ. विभोर बोरकर, डायरेक्टर, पेडिअॅट्रिक हेप्टोलॉजी आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96746 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..