पावसाळ्यानंतर बुरशीजन्य संसर्गात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यानंतर बुरशीजन्य संसर्गात वाढ
पावसाळ्यानंतर बुरशीजन्य संसर्गात वाढ

पावसाळ्यानंतर बुरशीजन्य संसर्गात वाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : पावसाळ्यानंतर बुरशीजन्य संसर्गात वाढ होत असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी नोंदवला आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यात अशा १० ते १५ प्रकरणांची नोंद होत आहे. आजार टाळण्यासाठी शरीराची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
हातावर खाज येणे आणि जखमांमुळे त्रस्त असलेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीवर काही विशिष्ट औषधे आणि तोंडावाटे अँटिफंगल (बुरशीविरोधी) गोळ्या देऊन काही महिने उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांना त्रासापासून आराम मिळाला. संबंधित व्यक्तीचा आजार इंटरट्रिगो म्हणजेच त्वचेचा एक भाग दुसऱ्या भागावर घासल्यामुळे होणारी जळजळ असा नोंदवला गेला. अशा अनेक तक्रारींसह रुग्ण दाखल होत आहेत.

‘पावसाळ्यानंतर बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. असा संसर्ग सामान्यत: एरिथेमॅटस् रॅशेस म्हणून ओळखला जातो. ज्यात नाण्याच्या किंवा अंगठीच्या आकाराचे वर्तुळ तयार होऊन तेथे खाज येते. सतत घाम येणाऱ्या किंवा कायम ओलसर असलेल्या भागात अधिक आणि वारंवार अशी वर्तुळे तयार होत असतात. ओलावा बुरशीच्या वाढीस प्रोत्साहन देतो आणि त्यामुळे संसर्ग वाढतो. अशी वर्तुळे हाता-पायांच्या बोटांमध्ये आणि पायाच्या तळव्यातही होऊ शकतात. पाय जास्त वेळ ओलसर बुटांमध्ये राहिल्यानेही अशी समस्या उद्‍भवते. अशा अवस्थेला ‘ॲथलिट फूट’ असेही म्हणतात.

बोटांतील बुरशीजन्य संसर्गामुळे नखे विकृत होऊ शकतात. त्याला ‘पॅरोनिचिया’ म्हणतात. अशा संसर्गाच्या उपचारांमध्ये विशिष्ट अँटीफंगल क्रीम आणि डस्टिंग पावडर व तोंडावाटे अँटीफंगल औषधे देणे यांचा समावेश असतो. ओलसर हवामानात असे संक्रमण अधिक प्रमाणात होते. आंघोळ वा हात-पाय धुतल्यानांतर ते व्यवस्थित सुती कपड्याने कोरडे करणे, संसर्ग असलेल्या व्यक्तींचे कपडे वेगळे धुणे, कपडे घालण्यापूर्वी ते इस्त्री करणे इत्यादी काळजी घेतल्यास संक्रमण टाळण्यास मदत होऊ शकते, असे वोक्हार्ट रुग्णालयाच्या सल्लागार प्लास्टिक सर्जन डॉ. श्रद्धा देशपांडे यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल मारफातिया म्हणाल्या, की पावसाळा वाढल्यावर जशी हाता-पायाला खाज येते, तसाच प्रकार कानाच्या बाबतीतही होतो. कान कोरडा ठेवला तर बुरशी जास्त वेळ राहत नाही. वातावरणातील बदलानंतर कानाच्या समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णांत नक्कीच वाढ झाली आहे.

पालिका रुग्णालयातही ४० ते ५० टक्के नोंद
पावसाळ्यात त्वचेतील ओलाव्यामुळे बुरशीजन्य आजार होतो. भिजल्याने बोटांच्या बेचक्यात किंवा ओले कपडे घातल्याने शरीरावर बुरशीचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याचदा रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय क्रिम वापरतात; पण त्यात स्टिरॉईड्स असते. ते वापरल्यामुळे फंगस तात्पुरता झाकला जातो. क्रिमचा वापर बंद केला की पुन्हा येतो. दररोज ओपीडीला जवळपास ४० ते ५० टक्के रुग्ण बुरशीजन्य आजारांचे असतात, असे केईएम रुग्णालयाच्या त्वचाविकार विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सिद्धी चिखलकर यांनी सांगितले.

आजार टाळण्यासाठी काय कराल?
- जागा आणि हात-पाय कोरडे ठेवावेत
- स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालावेत
- बुरशी झाल्यावर कपडे गरम पाण्याने धुवावेत
- सहा आठवड्यांपर्यंतच क्रिम वापरायला हव्या. पावडरचा वापर करा
- अंगाला चिकटणारे कपडे वापरणे टाळावे. कपडे वेगळे ठेवावेत
- बुरशीचे औषध जागेच्या दोन सेंटिमीटर बाहेर लावणे आवश्यक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96891 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..