खरीप पिकांचे उत्पादन किंचित कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरीप पिकांचे उत्पादन किंचित कमी
खरीप पिकांचे उत्पादन किंचित कमी

खरीप पिकांचे उत्पादन किंचित कमी

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ ः या वर्षीचे खरीप पिकांचे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा किंचित कमी तर या वर्षासाठी सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजापेक्षा चांगलेच कमी येईल, असा अंदाज आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आयोजित परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केला. त्यासाठी रजनी पणीकर-लांबा, अरुण यादव व जी. चंद्रशेखर या तज्ज्ञांनी मान्सूनची प्रगती तसेच लागवड झालेल्या पिकांचे क्षेत्र आणि सध्याची मुख्य पिकांची परिस्थिती यांचा आढावा घेतला. डाळींचे उत्पादनही गेल्या खरीप हंगामापेक्षा कमीच होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीचे उत्पादन ८४ लाख टन होते, पण यावर्षीचा सरकारचा अंदाज एक कोटी टनांचा आहे. मात्र, उत्पादनच कमी होणार असल्याने डाळींची तीस लाख टन आयात आवश्यक ठरेल, असेही सांगण्यात आले.

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचा गंगा किनाऱ्याचा प्रदेश या विभागांमध्ये लागवडीचे क्षेत्र घटल्यामुळे यावर्षी तांदळाचे उत्पादन दहा कोटी टन एवढेच होण्याची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी हे उत्पादन ११ कोटी टन एवढे झाले होते. केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्यात कर लावून देशातील लोकांसाठी पुरेसा तांदूळ राहील याची काळजी घेतली आहे, असे सांगण्यात आले. यावर्षी कापसांच्या तीन कोटी सत्तर लाख गाठींचे उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र, यावर्षीचे उत्पादन तीन कोटी पस्तीस लाख ते तीन कोटी ४५ लाख गाठींच्या आसपास होईल. उत्पादन वाढले तरी यावर्षी मागणीही वाढण्याची शक्यता असल्यामुळे कापसाची उपलब्धता अटीतटीची राहील असाही अंदाज आहे.

मागील वर्षी तेलबियांचे उत्पादन दोन कोटी चाळीस लाख टन झाले होते, तर यावर्षीचा सरकारचा अंदाज दोन कोटी ७० लाख टन होता. मात्र यंदाचे उत्पादन जास्तीत जास्त दोन कोटी २५ लाख टन एवढे होईल. एकंदरित पिकांचे उत्पादन कमी होईल. मात्र सप्टेंबर नंतर हवामानात अनपेक्षित मोठे बदल झाल्यास हे गणित थोडे बिघडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पिकांचे उत्पादन, किमती, आयात निर्यात यांच्यावर होऊ शकतो. त्यामुळे धोरणकर्त्यांनी याची वेळीच नोंद घेऊन योग्य पावले उचलली पाहिजेत असेही तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96925 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..