महिनाभरात बौद्धवाडीत रस्ता बांधणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिनाभरात बौद्धवाडीत रस्ता बांधणार
महिनाभरात बौद्धवाडीत रस्ता बांधणार

महिनाभरात बौद्धवाडीत रस्ता बांधणार

sakal_logo
By

श्रीवर्धन, ता. १५ (बातमीदार) : तालुक्यातील वडवली बौद्धवाडीतील रहिवाशांना ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या दुजाभावाचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या सुस्त कारभारामुळे खराब रस्ते, पाणी कपात, पथदिव्यांशिवाय अंधारात दिवस काढावे लागत आहेत. याप्रकरणी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्‍याची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी वाडीला भेट दिली आणि रस्‍त्‍याचे काम त्वरित सुरू करण्यात येणार असल्‍याचे सांगितले.
ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर श्रीवर्धनचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी स्थानिक ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता नुकतीच वडवली गावाला भेट दिली. ग्रामपंचायतीमधील कर्मचारी सुनील कडू यांच्यासह दलित वस्ती गाठली. बौद्धवाडीमध्ये गेल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला. बौद्धवाडीकडे जाणारा साधारण २५ वर्षांपूर्वी केलेला डांबरी रस्ता पूर्णतः उखडला आहे. मोठमोठे खड्डे पडले असून दगडांचा खच पडल्‍याने रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. याच रस्त्यावर लावलेला सौर ऊर्जेचा दिवाही दीड वर्षापासून बंद आहे. दिव्यासाठी लावलेला लोखंडी खांबही वाकला असून कोसळण्याच्या स्‍थितीत आहे.
त्यामुळे एकीकडे गाव उजेडात असताना बौद्धवाडीतील ग्रामस्थांना रात्री अंधारात चाचपडत काम करावे लागते.
कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा लक्षात घेऊन बौद्धवाडीसाठी नवीन पाईपलाईन टाकल्याचा दावा ग्रामपंचायतीकडून केला जात आहे; मात्र दररोज केवळ १५ मिनिटे पाणी सोडले जात असून त्याचा पुरवठाही कमी दाबाने होतो. पंचायत समितीने बांधून दिलेली बौद्ध समाजाची विहीर कोसळून १५ वर्षे झाली आहे; परंतु तिची डागडुजी न केल्याने पाण्याचा पारंपरिक स्रोत नामशेष होऊन दलित वस्तीतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, असे ग्रामस्थांनी सांगितले. 

समाजमंदिराचीही दुरवस्‍था
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बौद्धवाडीसाठी समाजमंदिर आणि शौचालय बांधले आहे. मात्र निसर्ग वादळाच्या तडाख्यात त्यांचे पत्रे उडून गेले. त्याची वेळेत दुरुस्ती न केल्याने ऊन-पावसाच्या माऱ्याने भिंती जीर्ण होऊन कोसळल्या आहेत. या समाजमंदिराचे दरवाजे-खिडक्याही मोडल्या आहेत, असेही त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले. 

वडवली गावातील बौद्धवाडीत रस्ता, समाजमंदिर व विहीर या प्रमुख मागण्या आहेत. दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याचे काम हे तत्काळ करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून महिनाभरात काम होईल. समाजमंदिरासाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. गावासाठी नवीन पाणी योजना मंजूर असल्याने बौद्धवाडीतील घरातही नळ जोडणी होईल. 
- गजानन लेंडी, गटविकास अधिकारी, श्रीवर्धन

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96985 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..