सहा दशकानंतर प्रत्यक्षात येणार एमटीएचएल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा दशकानंतर प्रत्यक्षात येणार एमटीएचएल
सहा दशकानंतर प्रत्यक्षात येणार एमटीएचएल

सहा दशकानंतर प्रत्यक्षात येणार एमटीएचएल

sakal_logo
By

सहा दशकांनंतर रायगड मुंबईच्या अधिक जवळ!
भारतातील सर्वात लांब ‘ट्रान्स हार्बर लिंक’ सागरी सेतू होणार आठपदरी
पुढील दोन दशकांत भासणार आणखी दोन मार्गांची गरज

तेजस वाघमारे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्हा जोडण्यासाठी सागरी पूल बांधण्याची शिफारस ६० वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी त्यासाठीच्या प्रकल्पाचा विचार होऊ शकला नाही. अखेर आता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाचे नियोजन सुरू झाले आहे. त्याचे ८४ टक्के काम पूर्णही झाले आहे. भारतातील सर्वात लांब सागरी सेतू ठरणार असलेला ‘एमटीएचएल’ प्रकल्प पुढील वर्षात सुमारे ६० वर्षांनी प्रत्यक्षात येणार आहे. पुढील दोन दशकांत वाहनांची रहदारी वाढणार असल्याने २०४२ पर्यंत साधारण २२ किमी लांब असलेल्या सागरी सेतूवर आणखी दोन मार्गांची आवश्यकता भासणार आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच मुंबई शहर आणि नवी मुंबईमधील दळणवळण वाढण्याच्या दृष्टीने २००४ पासून मुंबई पोरबंदर प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २१.८ किमी लांबीच्या सहा लेनच्या समुद्री मार्गाचे बांधकाम हाती घेतले आहे.

सागरी सेतूची वैशिष्ट्ये
- १६.५ किमीचा मार्ग समुद्रातून जाणार. उर्वरित ५.३ किमीचा रस्ता जमिनीवर
- मुंबईहून नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याला थेट जोडणार
- मुंबईत शिवडी, मुंबईच्या खाडीवर शिवाजीनगर आणि नवी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग ३४८ वर चिर्ले गावाला मार्ग जोडला जाणार
- सध्या प्रकल्पाचे सुमारे ८४ टक्के काम पूर्ण
- २०२३ च्या अखेरीस पूर्ण झाल्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार
- भारतातील सर्वाधिक लांब सागरी सेतू ठरणार

‘एमटीएचएल’च्या अहवालातील अंदाज
- सागरी सेतू खुला होताच दरदिवशी धावणारी वाहने ः ७० हजार
- २०३२ मध्ये सेतूवरील रोजची वाहनांची वर्दळ ः १ लाख ३ हजार ९००
- २०४२ मध्ये रोज धावू शकणारी वाहने ः १ लाख ४५ हजार

वाहनांची संख्या वाढती
१. शिवडी आणि शिवाजी नगर इंटरचेंजदरम्यान २०३२ पर्यंत सागरी सेतूवरून दररोज सुमारे १ लाख ३ हजार ९०० वाहने धावण्याचा अंदाज आहे. त्यामध्ये सर्वाधिक ६६ हजार ४०० कार, १४ हजार १०० टॅक्सी, ३ हजार ७०० बस आणि त्याच प्रमाणात अवजड वाहनांचा समावेश आहे.
२. २०४२ मध्ये शिवडी आणि शिवाजीनगर इंटरचेंजदरम्यान १ लाख ४५ हजार ५०० वाहने दररोज धावतील. त्यामध्ये ९४ हजार १०० कार, २० हजार २०० टॅक्सी आणि ३ हजार ७०० बस धावण्याचा अंदाज आहे.
३. शिवाजीनगर आणि चिर्ले इंटरचेंजदरम्यान २०३२ मध्ये २९ हजार ६०० वाहने धावण्याचा अंदाज असून २०४२ मध्ये ती संख्या ५५ हजारापर्यंत वाढणार आहे. इंटरचेंजदरम्यान २०३२ मध्ये २१ हजार ३०० कार, ४०० टॅक्सी आणि ३ हजार ७०० बस धावतील. २०४२ मध्ये इंटरचेंजदरम्यान ४३ हजार ३०० कर, २ हजार ३०० टॅक्सी आणि ३ हजार ७०० बस धावू शकणार आहेत.

असा असेल टोल
वाहनाचा प्रकार शिवडी ते शिवाजीनगर शिवाजीनगर ते चिर्ले एकूण
- कार १८० ६० २४०
- बस ४२० १३० ५५०
- हलके वाहन २४० ७० ३१०
- अवजड वाहन ४२० १३० ५५०
(सुधारित धोरणानुसार टोलमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.)

असा आकारणार टोल
‘एमटीएचएल’चा वापर करण्यासाठी वाहनांच्या प्रकारानुसार टोल आकारण्यात येणार आहे. त्यासाठी दोन प्रकारे टोल वसूल करण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन आणि मॅन्युअल अर्थात रोख पैसे स्वीकारणे, असे पर्याय असतील.

वाहतूक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञाचा वापर
‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’वरील वाहतूक व्यवस्थापनासाठी एमएमआरडीएने विविध तंत्रज्ञांचा आधार घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार एक किलोमीटरच्या अंतरावर तीन ठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. अपघात किंवा इतर कोणती मदत हवी असल्यास वाहनचालकांची आपत्कालीन कॉल बॉक्सची सुविधा देण्यात येणार आहे. ऑटोमॅटिक ट्रॅफिक काऊंटर, हवामान डेटा सिस्टीम आणि विविध संदेशांचे फलकही असतील.


एमटीएचएल प्रकल्प २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष्य आहे. प्रकल्पाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल असेल.
- एस. व्ही. आर. श्रीनिवास, आयुक्त, एमएमआरडीए

१९६२ मध्ये सागरी पुलाची शिफारस!
मुंबई शहर, नवी मुंबई आणि रायगडला जोडण्याबाबत अभ्यास करण्यासाठी १९६२ मध्ये ग्रेटर बॉम्बेने एका संस्थेची नेमणूक केली होती. त्या संस्थेने विस्तृत अभ्यासाअंती १८ महिन्यांत आपला अहवाल सादर केला. त्या अहवालात मुंबई शहर, नवी मुंबई आणि रायगड यांना जोडण्यासाठी सागरी सेतू उभारण्याची शिफारस करण्यात आली होती. १९६३ मध्ये अहवाल केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, राजकीय इच्छाशक्तीमुळे प्रकल्प रखडला.
(संदर्भ ः विकिपीडिया)

...तर मुंबईचे वाटोळे टळले असते
मुंबई शहर रायगड जिल्ह्याला जोडण्यासाठी ५५ ते ६० वर्षांपूर्वी सागरी पूल उभारण्याची चर्चा झाली. मात्र, राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्याने सागरी सेतू उभा राहू शकला नव्हता. तो प्रकल्प त्या कालावधीत पूर्ण झाला असता, तर आज मुंबईचे वाटोळे झालेले आपणास पाहण्यास मिळाले नसते. त्यासोबतच गोरगरिबांना कमी किमतीमध्ये नवी मुंबई परिसरात घरेही मिळाली असती. राजकीय मंडळी स्वतःच्या फायद्याचा विचार करतात; परंतु सर्वसामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडतात, याचे हे उदाहरण मानता येईल.
- अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97018 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..