मुंबई : लेप्टो आणि डेंगीची टांगती तलवार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई : लेप्टो आणि डेंगीची टांगती तलवार!
लेप्टो आणि डेंगीची टांगती तलवार

मुंबई : लेप्टो आणि डेंगीची टांगती तलवार!

मुंबई : पावसाचा जोर वाढल्याने संपूर्ण शहरात लेप्टोस्पायरोसिस आणि डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. आकडेवारीनुसार मुंबईत १ जानेवारी ते ४ सप्टेंबरदरम्यान लेप्टोचे १६९ रुग्ण आढळले. याच कालावधीत डेंगीच्या ३८२ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुसळधार पावसात नागरिकांनी साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून चालत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत. पावसाच्या साचलेल्या पाण्यात लेप्टोस्पायरा नावाचा जीवाणू असतो. एखादी व्यक्ती अशा दूषित पाण्याच्या संपर्कात आली तर त्याला लेप्टोची लागण होण्याची शक्यता जास्त असते, असे पालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याचा इतिहास असलेल्या नागरिकांनी ७२ तासांच्या आत लेप्टोस्पायरोसिसच्या रोगप्रतिबंधक उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्व खासगी प्रॅक्टिशनर्सना विनंती आहे, की पावसाळ्यात सर्व तापाच्या रुग्णांना लवकर उपचार मिळावे म्हणून डॉक्सिसायक्लिन सुरू करावी. डॉक्सिसायक्‍लिनमुळे अवयवांना होणारी बाधा आणि इतर गुंतागुंत टळण्यास मदत होते. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसमुळे होणारे मृत्यू टाळता येतात.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, संसर्गजन्य रोग लेप्टोस्पायरा वंशातील जीवाणूंमुळे होतो. अतिवृष्टी किंवा पूर आलेल्या भागात लेप्टो आढळतो. पाळीव प्राण्यांसह इतर जनावरांमध्येही तो होऊ शकतो. संक्रमित जनावरांच्या लघवीद्वारे त्याचा प्रसार होतो. दरम्यान, मनुष्यापासून दुसऱ्या व्यक्तीला फार क्वचितच संक्रमण होते.

घरगुती उपाय शक्यतो टाळा!
तापमानात अचानक झालेल्या बदलांमुळे शरीराला आजार जडण्याची शक्यता असते. उष्ण, दमट आणि ओले हवामान शरीरातील सूक्ष्मजीवांना पुनरुत्पादन आणि वाढीसाठी अनुकूल बनवते. डेंगी, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि चिकुनगुनियासारखीच लक्षणे असल्याने नागरिकांनी तातडीने डॉक्टरी उपचार घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. कोणतेही घरगुती उपाय करू नयेत, असे आवाहन संसर्गजन्य रोग तज्ज्ञाने केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97032 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..