‘वालधुनी’ची रंगाच्या शापातून सुटका होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वालधुनी’ची रंगाच्या शापातून सुटका होणार
‘वालधुनी’ची रंगाच्या शापातून सुटका होणार

‘वालधुनी’ची रंगाच्या शापातून सुटका होणार

sakal_logo
By

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १५ : अधूनमधून लाल, हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी या रंगाने वाहण्याचा शाप उल्हासनगरातील वालधुनी नदीला बसलेला आहे. आता नदीत केमिकलचे विविध रंगाचे पाणी सोडण्यावर वॉच ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशेष पथकाची स्थापना केल्याने वालधुनी नदीची बदलत्या रंगाच्या शापातून सुटका होणार आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे गटारगंगा झालेल्या वालधुनी नदीच्या रंगात दिवसागणिक बदल होत असतो. कोणतीही प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने गेल्‍या रविवारी सकाळच्या सुमारास वालधुनी नदीचा रंग गुलाबी झाला होता. उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या शेजारून जाणाऱ्या वालधुनी नदी बिरादरीच्या हरी चावला यांनी हे चित्र दरम्‍यानच्‍या काळात कैद केले. सुट्टीच्या दिवसात अशा प्रकारे सांडपाणी सोडल्याचे प्रकार वारंवार दिसून आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून वालधुनी नदीकडे पाहिले जाते. अंबरनाथ तालुक्यातील टाहुलीच्या डोंगरात उगम पावणाऱ्या या वालधुनी नदीवर अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीशेजारी भारतीय रेल्वेचे जीआयपी धरण आहे. येथील पाण्याचा वापर करून रेलनीर हे बाटलीबंद पाणी रेल्वे प्रशासन प्रत्येक स्थानकावर पुरवते. मात्र, त्यापुढे नदीमध्ये औद्योगिक सांडपाणी आणि नागरी सांडपाणी मिसळत असल्याने वालधुनी नदीची गटारगंगा होते. याच वालधुनी नदीवर प्राचीन शिवमंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत वालधुनी नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. शहरातील, शहराबाहेरून आणि परराज्यातून येणाऱ्या रासायनिक सांडपाण्याच्या टँकरचा निचरा या वालधुनीत अनेकदा केला गेला आहे. त्याच्या बाधेची झळ नागरिकांना सोसावी लागली. आजही अनेक कारखान्यांमधून वालधुनी नदीत सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे अनेकदा वालधुनी नदीच्या पाण्याचा रंग बदललेला दिसतो. गेल्‍या रविवारी अशाच प्रकारे उल्हासनगर रेल्वे स्थानकाशेजारी वाहणाऱ्या वालधुनी नदीचा रंग गुलाबी झाल्याचे दिसून आले.
काही कारखान्यांवर गुन्हे दाखल
शनिवार आणि रविवार किंवा सणांच्या निमित्ताने आलेल्या सुट्टीचा फायदा घेत प्रदूषणकारी घटक वालधुनी नदीत सोडले जात असल्याचे दिसून आल्याची माहिती वालधुनी जलबिरादरीचे शशिकांत दायमा यांनी दिली आहे. सकाळच्या सुमारास किंवा पाऊस सुरू असताना केमिकलचे पाणी सोडले जाते. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबरनाथच्या हद्दीतील काही कारखान्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. मात्र, कालांतराने जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याचे शशिकांत दायमा यांनी सांगितले आहे.
८० टक्के सुधारणा
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बी. एन. कुकडे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, विविध रंगाचे केमिकलचे पाणी सोडणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे ८० टक्के सुधारणा झाल्याचे चित्र दिसत असल्‍याची माहिती कुकडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97036 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..