वसईत बविआसह सेनेचा स्वबळाचा नारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत बविआसह सेनेचा स्वबळाचा नारा
वसईत बविआसह सेनेचा स्वबळाचा नारा

वसईत बविआसह सेनेचा स्वबळाचा नारा

sakal_logo
By

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा

विरार, ता. १७ : वसई तालुक्यात होत असलेल्या ११ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी साऱ्याच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, जागोजागी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या निवडणुकीत बविआने आणि सेनेने स्वबळाचा नारा दिला आहे; तर भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
वसई तालुक्यातील पूर्वपट्टीमधील ११ ग्रामपंचायतींची निवडणूक १३ ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी सरपंचपदाची निवडणूक थेट नागरिकांमधून होणार असल्याने त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार निवडीसाठी बैठका घेतल्या जात आहेत. ११ ग्रामपंचायतींमधील ९ ग्रामपंचातींवर वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडीने स्वबळाचा नारा देत उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे; तर दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ग्रामीण भागात एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिरकाव मिळाला नसल्याने ते या निवडणुकीत काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ग्रामीण भागात आता पूर्वीसारखी काँग्रेसची ताकद राहिली नसली तरी अजूनही काँग्रेसला मानणारा वर्ग त्या ठिकाणी असला तरी स्वबळावर ते निवडणूक लढण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे; तर पूर्वपट्टीत राष्ट्रवादीचे अस्तित्व फार कमी असल्याने ते इतर पक्षांबरोबर युती करण्याच्या मनःस्थितीत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी पालघर जिल्ह्यावर वर्चस्व असलेल्या भाजपचीही तीच अवस्था असून ते समविचारी पक्षांशी म्हणजेच श्रमजीवी संघटनेशी युती करण्याच्या मनःस्थितीत आहेत. पूर्वपट्टीत आदिवासींची मोठी ताकद असून त्याठिकाणी श्रमजीवी संघटना कामाला येईल, असा मतप्रवाह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधून व्यक्त होत आहे; तर श्रमजीवी संघटना गेल्या वेळी सेनेबरोबर होती. आता ती कोणाला साथ देते, यावर पुढची समीकरणे अवलंबून आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97048 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..