थकीत वेतनासाठी कामगारांचे भीक मांगो आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकीत वेतनासाठी कामगारांचे भीक मांगो आंदोलन
थकीत वेतनासाठी कामगारांचे भीक मांगो आंदोलन

थकीत वेतनासाठी कामगारांचे भीक मांगो आंदोलन

sakal_logo
By

वाशी ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेतील उद्यान विभागातील वाशी, तुर्भे, नेरूळ येथील एकूण १५८ कामगारांचे मागील ऑगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला तरी मिळाले नाही. गणेशोत्सवात ३० ऑगस्टपर्यंत वेतन देण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असून थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी समाज समता कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी कामगारांनी पालिकेच्या विरोधात तीव्र घोषणा बाजी दिली. आजच्या आंदोलनानंतरही वेतन न दिल्यास उद्या शनिवारी सकाळी १० वाजता आयुक्त अभिजित बांगर यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात येईल, असे कामगारांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई महापालिका हरित नवी मुंबई, पर्यावरणपूरक शहर म्हणून डंका वाजवत आहे; परंतु असे असताना दुसरीकडे मात्र वृक्षांची देखभाल करणारे उद्यान विभागातील माळी कर्मचारी यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ऐरोली विभागातील उद्यान कामगारांनी चार वेळा मुख्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर त्यांचे वेतन दोन दिवसांत देण्यात आले; परंतु तुर्भे, नेरूळ, वाशी विभागात कार्यरत असणाऱ्या कामगारांना मागील महिन्याचे वेतन दिलेले नाही. उद्यान विभागातील कामगारांनी आंदोलन केल्यानंतरच कामगारांना मासिक वेतन दिले जात आहे; असा कामगारांमध्ये दुजाभाव करणारा प्रकार प्रशासनाकडून सुरू असल्याने कामगारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. श्रीमंत महापालिकेतील कामगारांचे मासिक वेतनासाठी भीक मांगो आंदोलन म्हणजे शोकांतिका असल्याचे समाज समता कामगार संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी या वेळी सांगितले. नवी मुंबई महापालिकेच्या वाशी विभागात ७३, नेरूळ विभागात ६०; तर तुर्भे विभागात ३५ असे एकूण दीडशे कामगार पगारापासून वंचित आहेत. या आंदोलनात महेंद्र पाटील, गणेश पाटील, परेश सावंत, यशवंत पाटील, रवी धोंडकर, वसंत भगत आणि उद्यान विभागातील कामगार सहभागी होते.


कारवाईची मागणी
---------------
याप्रकरणी पालिका आयुक्त बांगर यांनी वाशी विभागाचे ठेकेदार एन. के. शहा इंटरप्रायझेस, नेरूळचे जय भवानी इंटरप्रायझेस, तुर्भे येथील डी. एम. इंटरप्रायझेस यांच्यावर त्याचप्रमाणे उद्यान विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97144 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..