जळगाव एआरटीओत भ्रष्टाचाराचे सिंडीकेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव एआरटीओत भ्रष्टाचाराचे सिंडीकेट
जळगाव एआरटीओत भ्रष्टाचाराचे सिंडीकेट

जळगाव एआरटीओत भ्रष्टाचाराचे सिंडीकेट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून वाहतूकदारांचा छळ केला जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. एजंटच्या माध्यमातून मालवाहतूकदारांकडून पैशांची मागणी केली जात आहे. परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही तसेच स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांचे संगनमत असल्याची तक्रार चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील मालवाहतूकदारांकडून दर महिन्याच्या १ ते ५ तारखेला अवैध हप्तेवसुली केली जाते. जे वाहनचालक हप्ते देत नाहीत, त्यांच्या गाड्या जमा करून त्रास दिला जातो. ३ सप्टेंबर रोजी अशी घटना प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन अनुभवली. यासंदर्भात एआरटीओतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारल्यास वाहनांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगितले जाते. एजंटच्या माध्यमातून एआरटीओ अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी अवैध वसुली करत असल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे.

प्रासंगिक करारावर चालणाऱ्या व टप्पा वाहतूक न करता शासनाचा परिवहन महामंडळाचे उत्पन्न न बुडवणाऱ्या खासगी बसेस मालकांनादेखील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही व त्यांचे अधिनस्त अधिकारी, कर्मचारी त्रास देतात. हजारोंचा दंड वसूल करतात, असा आरोप चव्हाण यांनी केला. मात्र, जळगावमध्ये ओव्हरलोड वाळू व गौण खनिज वाहतूक करणारी वाहने, सिमेंट व बांधकाम साहित्य वाहतूक करणारे शहरातील ट्रॅक्टर, सर्व भंगार वाहतूक करणाऱ्या अजिंठा मार्गावरील ट्रक, नेरी नाक्यावरील टप्पा वाहतूक करणाऱ्या बसेस यांच्या कागदपत्रांची कुठलीही पडताळणी न करता त्यांच्याकडून भरमसाट हप्ता वसूल केला जातो, असेही त्यांनी म्हटले आहे.
----------
एआरटीओ लोही आणि त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वाहतूकदारांना पैशांसाठी त्रास दिला जातो. या प्रकरणात अनेकांचे संगनमत आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
- मंगेश चव्हाण, आमदार, भाजप
------------
आम्ही अंमलबजावणीचे काम करत असतो. नियमित आढावा घेतला जातो. लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, या दृष्टीने काम केले जाते. प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाते. त्याचे रिपोर्ट शासनाकडे पाठवले जातात. सर्वसामान्यांसाठी ऑनलाईन सेवा सुरू करून दिल्या आहेत. अशी काही तक्रार मिळाली असती, तर नक्कीच कठोर कारवाई केली असती. मात्र, या प्रकरणात आमदारांची एकही तक्रार माझ्यापर्यंत आली नाही.
- अविनाश ढाकणे, आयुक्त, परिवहन विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97148 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..