माजी उपमहापौर अशोक गावडे यांचा शिंदे गटात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी उपमहापौर अशोक गावडे यांचा शिंदे गटात प्रवेश
माजी उपमहापौर अशोक गावडे यांचा शिंदे गटात प्रवेश

माजी उपमहापौर अशोक गावडे यांचा शिंदे गटात प्रवेश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. १६ : राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. गावडे यांच्यासोबत त्यांची मुलगी माजी नगरसेविका सपना गावडे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. गावडे यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे आणखीन पाच नगरसेवकही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा नवी मुंबईतील शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे.
माजी मंत्री आणि आमदार गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गावडे यांनी राष्ट्रवादीला सावरले. पक्षाच्या पडझडीच्या काळात अशोक गावडे यांनी नवी मुंबईत राष्ट्रवादीला स्थिर नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात अशोक गावडे यांना पक्षात एकाकी पाडण्यात आले. पक्षश्रेष्ठींनी बाहेरून नवी मुंबईवर नेमण्यात आलेल्या नेते मंडळींनी गावडे यांना कमी महत्त्व देऊन बाहेरून आलेल्यांना पायघड्या घातल्याचा आरोप गावडे यांनी केला. गावडे यांचे पक्षातील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे गावडे पक्ष सोडण्याच्या निर्णयावर आले होते. अखेर गावडे यांना शिंदे गटाने गळाला लावल्यानंतर काल रात्री उशिरा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गावडे यांनी राष्ट्रवादीतील जिल्हा उपाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्यासाहित २०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन शिंदे गटात प्रवेश केला. गावडे यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मोठा गट राष्ट्रवादीपासून दुरावला आहे. गावडे यांच्या रूपाने नवी मुंबईत राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्राचा मोठा वर्ग नेरूळ परिसरात पाठिंबा देत होता. नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावडे यांचा शिंदे गटात केलेला प्रवेश उभारी देणारा ठरणार, तर राष्ट्रवादीचे नुकसानी होईल, अशी चर्चा नवी मुंबईत रंगली आहे.

बाकीचे पाच नगरसेवक लवकरच प्रवेश करणार
--------------------------------------------
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे आणखीन पाच नगरसेवक प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिंदे गटासोबत या नगरसेवकांची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या नगरसेवकांसोबत एकीकडे शिंदे गटाकडून बोलणी सुरू असताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून फक्त फोनवर विचारपूस केली जात असल्याने प्रचंड नाराजी असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात रंगली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97161 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..