एसटीची कोट्यवधींची उड्डाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीची कोट्यवधींची उड्डाणे
एसटीची कोट्यवधींची उड्डाणे

एसटीची कोट्यवधींची उड्डाणे

sakal_logo
By

राजेश कांबळे, पेण

सुखकर आणि आरामदायी प्रवासासाठी असणाऱ्या महाराष्ट्राच्या लाल परीने या वर्षी गणेशोत्सवात तब्‍बल ६ कोटी ५७ लाख रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. जिल्ह्यातील आठ डेपोंतून असंख्य बस या दरम्यान कोकणात धावल्या असून जवळपास १२ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे आजही नागरिकांनी एसटीलाच पसंती दिली असल्याची माहिती रायगड विभागामार्फत देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पेण, अलिबाग, रोहा, कर्जत, मुरूड, श्रीवर्धन, माणगाव, महाड या डेपोत उत्‍सव काळात, २७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत विशेष बस सेवा सुरू करण्यात आल्‍या होत्‍या. यामध्ये २८ हजार ५०४ एवढ्या फेऱ्या, तर १७ लाख ५३७ किलोमीटर गाड्या धावल्‍या असून ११ लाख ८९ हजार ५०७ नागरिकांनी सुखकर प्रवास केला आहे. आपल्या हक्काची आणि सर्वसामान्यांना परवडणारी, खेडोपाड्यापर्यंत पोचणारी एसटी गणेशभक्‍तांच्या चांगलीच पसंतीस उतरली.
१९८४ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना झाली. मात्र या विभागाला एसटी महामंडळ याच नावाने प्रवाशांनी पसंती देत पुढे ‘लाल परी’ म्हणून संबोधले. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन अनेक अडथळ्यांवर मात करत एसटी सेवा देणारी ही वाहतूक यंत्रणा प्रवाशांच्या विश्‍वासास पात्र ठरली आहे. त्‍यामुळेच उत्‍सवकाळात एसटीच्या उत्‍पन्नात कोट्यवधींची भर पडली आहे.

रायगड जिल्हा एसटी महामंडळाने गणेशोत्सवात चांगली बस सेवा दिल्‍याने प्रवास सुखकर झाला. अनेक वर्षे आम्ही न चुकता एसटीनेच कोकणात जातो. यावेळी आगाऊ बुकिंगची सुविधा उपलब्‍ध होती.
- बबलू अभ्यंकर, प्रवासी, गोरेगाव-मुंबई

कोकणात गणेशोत्‍सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, त्‍यामुळे या दरम्‍यान प्रवाशांची संख्या वाढते. सुखकर आणि आरामदायी प्रवास देणाऱ्या एसटीवर आजही सर्वसामान्य प्रवाशांचा विश्‍वास आहे. त्‍यामुळे या वर्षी चांगले उत्पन्न मिळाले. आम्‍ही यापुढेही अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्‍न करू आणि प्रवाशांचा विश्‍वास कायम सार्थ ठरवू.
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, रायगड

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97185 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..