जिल्ह्यात लम्पीने बाधित जनावरांची संख्या ४३ वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात लम्पीने बाधित जनावरांची संख्या ४३ वर
जिल्ह्यात लम्पीने बाधित जनावरांची संख्या ४३ वर

जिल्ह्यात लम्पीने बाधित जनावरांची संख्या ४३ वर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात लम्पी आजाराने बाधित जनावरांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात लम्पी आजाराच्या बाधित जनावरांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. बाधित जनावराच्या ठिकाणापासून पाच किमीपर्यंतच्या परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक असलेला लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून जनावरांना ही लस मोफत देण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांनी दिली.
जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण झाल्याची बाब समोर आली. त्यातच या आजाराने बाधित झालेल्या जनावरांची संख्या थेट ४३ वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील १२ गायीवर्ग, भिवंडीत चार, कल्याण दोन, पशू सर्व चिकित्सालय शेलार येथे १० जनावरांमध्ये, तालुका लघु चिकित्सालय शहापूर येथील चार आणि बदलापूर तालुका लघु चिकित्सालय येथील ११ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून या जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील जनावरांचे लसीकरण करण्यासाठी ३८ हजार लशीचा साठा उपलब्ध आहे. तसेच जनावरांना ही लस मोफत देण्यात येत आहे. तसेच पशुपालकाला जनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पशु रुग्णालयात नेऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. रूपाली सातपुते यांनी केले. तसेच इतर वेळी जनावरांच्या तपासणीसाठी शासकीय पशु रुग्णालयांमध्ये दहा रुपये आकारणी करण्यात येत असते. मात्र, या आजाराच्‍या पार्श्वभूमीवर अशी कोणतीही आकारणी करण्यात येत नसून मोफत उपचार करण्यात येत असल्याची माहितीदेखील डॉ. सातपुते यांनी दिली. तसेच जर कोणी तपासणी दराची आकारणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेदेखील या वेळी डॉ. सातपुते यांनी सांगितले.
आठ हजार ४५० जनावरांचे लसीकरण
बदलापूर, शहापूर, भिवंडीतील शेलार, भिवंडी पालिका हद्दीतील बाधित क्षेत्रातील १० हजार ५७७ जनावरांपैकी आठ हजार ४५० जनावरांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी दिली.
.........
लम्‍पीचा धोका कमी
म्हशींमध्ये लम्पी हा आजार आढळून येत नाही. याचा प्रादुर्भाव हा गायीवर्गाच्या जनावरांमध्ये अधिक आढळून येत आहे. त्यात जिल्ह्यात गायीवर्गाचे प्रमाण ७५ हजार इतके असून असून म्हैसवर्गाचे प्रमाण ९५ हजार इतके आहे. त्यामुळे गायीवर्गाचे प्रमाण आणि म्हैसवर्गाचे प्रमाण यांची तुलना केल्यास गायीवर्गाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात या आजाराचा धोका तुलनेने कमी असल्याचे मत, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97188 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..