फुलपाखरांच्या गावात सफारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलपाखरांच्या गावात सफारी
फुलपाखरांच्या गावात सफारी

फुलपाखरांच्या गावात सफारी

sakal_logo
By

चैताली वर्तक, ठाणे

फुलपाखरू... छान किती दिसते... या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हसते... लहानपणी हमखास कानावर आलेली ही कविता... आज इतक्या वर्षांनंतरही फुलपाखराला पाहताना ही कविता मनामनांत रुंजी घातल्‍याशिवाय राहत नाही. हल्ली सिमेंटच्या जंगलात फुलपाखरेही दिसेनाशी झाली आहेत. म्हणूनच आता त्यांची मनसोक्त भेट घ्यायची असेल तर फुलपाखरांच्या गावात म्हणजे उद्यानात जाण्याशिवाय पर्याय नाही. ठाण्यात फुलपाखरू उद्याने असून सध्या ‘बिग बटरफ्लाय मंथ’च्या निमित्ताने त्याची सफर करण्याची अनोखी संधी पर्यावरणप्रेमी आणि ठाणेकरांना मिळत आहे.
निळे, पिवळे, जांभळे अशा विविध रंगांची उधळण करत भिरभिरणारी फुलपाखरे म्हणजे निसर्गाचे वरदान. पण केवळ रुपाने नव्हे तर निसर्गचक्र सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणून फुलपाखरांना विशेष महत्त्व आहे. परागीभवनाच्या माध्यमातून फुलझाडांच्या वंशवाढीच्‍या प्रमुख स्रोताची जबाबदारी फुलपाखरू पार पाडत असते. पण सध्या वाढते नागरीकरण फुलपाखरांच्याच मुळावर येऊ लागले आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे त्यांच्या अनेक प्रजाती दुर्मिळ झाल्या आहेत. या प्रजाती भविष्यात लोप पावता कामा नये यासाठी फुलपाखरांच्या संवर्धनासाठी भारतामध्ये सप्टेंबर महिना हा ‘बिग बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो.
याच काळात सर्वाधिक फुलपाखरे सर्वत्र आढळतात. त्यानिमित्ताने ठाण्यातील जंगल हाईक संस्थेने दर रविवारी ओवळा येथील फुलपाखरू उद्यानात एका सहलीचे आयोजन करून या इवल्याशा जीवाच्या संवर्धनासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, याबाबत जनजागृती सुरू केली आहे. संस्थेच्या संस्थापिका प्रा. क्लारा कोरिया यांनी या मोहिमेत बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. मोझेस कोलेट यांची मदत घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व जैवविविधता विभाग, वन्यजीवन संरक्षण आणि व्यवस्थापन विद्यार्थ्यांसोबत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

ठाण्यात १६० प्रजाती
देशभरात सुमारे दीड हजाराहून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. यापैकी मुंबई, ठाण्यात साधारण १६० प्रजाती आढळून येतात. जंगल हाईक संस्थेने या मोहिमेअंतर्गत फुलपाखरू निरीक्षण आणि त्यांच्या प्रजातीची नोंदणी सुरू केली आहे. सप्टेंबर महिन्‍याच्या प्रत्येक रविवारी सकाळच्या वेळेत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत ठाणे कॉलेज, दत्ताजी साळवी उद्यान (कोपरी), एसजीएनपी-मानपाडा आणि ओवळेकरवाडी येथील उद्यानात आतापर्यंत निरीक्षण करण्यात आले आहे. सफारीत फुलपाखरांच्‍या नोंदी मागील रविवारी मानपाडा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्कीपर, बुश ब्राऊन, रेड पॅरोट, कॉमन गुल, पेंटेड गुल, ब्ल्यू मोरमान आदी २८ प्रकारच्या फुलपाखरांची नोंद करण्यात आली. ओवळा येथील बटरफ्लाय गार्डनमध्ये ४१ फुलपाखरांची नोंद करण्यात आली. रविवारच्या या फ्री वॉक मोहिमेमध्‍ये मुंबई, ठाणे परिसरातील ३६ फुलपाखरूप्रेमी सहभागी झाले होते.

पोषक वातावरण हवे
आपल्याकडे फुलपाखरांची उद्याने असली तरी त्यांच्या पोषणासाठी पोषक वातावरण नाही. फुलपाखरांना आकर्षित करणारी फुलझाडे, गवत असणे गरजेचे आहे. याशिवाय ही जबाबदारी केवळ पालिकेची किंवा प्रशासनाची नाही; तर आपणही फुलपाखरू संवर्धनासाठी जमेल तितकी झाडे, फुलझाडे लावून हातभार देऊ शकतो, असे या मोहिमेच्या आयोजिका क्लारा कोरिया यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97195 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..