रस्त्यांवर फेरीवाल्यांची दादागिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यांवर फेरीवाल्यांची दादागिरी
रस्त्यांवर फेरीवाल्यांची दादागिरी

रस्त्यांवर फेरीवाल्यांची दादागिरी

sakal_logo
By

जुईनगर, ता. १७ (बातमीदार) ः सानपाडा विभागामध्ये चांगल्या दर्जाचे भाजी मार्केट उपलब्ध व्हावे, तसेच फेरीवाल्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी नियोजनबद्ध मार्केट तयार करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुरू असलेल्या या मार्केटचे काम पूर्णत्वास आले आहे; मात्र सहा ते सात महिने होऊनदेखील या मार्केटमधील गाळ्यांचे वाटप झाले नसल्याने सानपाड्यातील रस्त्यांवर बेकायदा फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले आहे.
सानपाडा विभागात सध्या गोवंडी, मानखुर्द विभागातील फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. हे फेरीवाले रस्त्यांवर भाजी विकायला बसत असून यामुळे वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. सानपाडा स्टेशन परिसरात सध्या या फेरीवाल्यांनी स्वतःचे बस्तान बसवले आहे. पालिका कर्मचाऱ्यांकडून या फेरीवाल्यांवर अनेकदा कारवाई ही केली जात आहे, पण कर्मचारी गेल्यावर पुन्हा फेरीवाले अतिक्रमण करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अनेकदा कारवाईच्या वेळी हे फेरीवाले कर्मचाऱ्यांवर धावून जात असून नको ते अपशब्ददेखील बोलत असल्याने पालिकेचे कर्मचारीदेखील कारवाईसाठी धजावत आहेत. शिवाय रस्त्यांवरच कचरा टाकला जात असल्याने रहिवाशांना दुर्गंधीचादेखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांची ही अरेरावी थांबवण्यासाठी मनपाने सानपाड्यातील कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला दैनंदिन बाजार सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
----
मंडईसाठी १ कोटी १७ लाखांचा खर्च
मनपाच्या वतीने नवी मुंबई शहरामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये भाजीमंडईचे व्यवस्थापन करण्यात आले. सानपाडा विभागातील सेक्टर ४ मध्ये एक कोटी १७ लाख रुपये खर्च करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. या मंडईमध्ये भाजीविक्रेत्यांना बसण्यासाठी ७० ओटे बांधण्यात आले आहे; मात्र त्याचा वापर होत नसल्यामुळे हे ओटे धूळ खात पडले आहेत.
-----
भाजी मंडईचे काम पूर्ण झाले असून अद्याप ते चालू करण्यात आले नाही. त्यामुळे पावसामध्ये व्यवसाय करताना अडचण निर्माण होते. भाजी मंडई बंद असल्याने त्याचा फायदा बाहेरील फेरीवाले घेत आहेत. त्यामुळे लवकर ओट्यांचे वाटप करावे.
- संदीप चव्हाण, भाजीविक्रेते
---
कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या मंडईचे ओटे सहा ते सात महिन्यांपासून धूळ खात पडलेले आहेत. या ओट्याचे लवकरात वाटप करण्यात यावे. यासाठी आयुक्तांना भेटणार आहे. जोपर्यंत मार्केट चालू होत नाही तोपर्यंत फेरीवाले हटणार नाहीत.
- अजय पवार, शिवसेना शाखाप्रमुख, सानपाडा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97212 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..