धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा
धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा

धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा

sakal_logo
By

प्रकाश लिमये : भाईंदर
शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी समूह विकास (क्लस्टर डेव्हलपेंट) योजना राबविण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रशासकीय ठरावाला आयुक्त दिलीप ढोले यांनी मान्यता दिली आहे. याआधी सत्ताधारी भाजपने सलागार नेमणुकीचा प्रशासनाचा प्रस्ताव महासभेत फेटाळून लावला होता; मात्र आता प्रशासकीय राजवट सुरू झाली असल्यामुळे आयुक्तांनी आपल्या अधिकारात सल्लागार नेमणुकीस मान्यता दिली आहे.
ग्रामपंचायत आणि नगर परिषदेच्या काळात बांधकाम झालेल्या अनेक इमारती आज मोडकळीस आल्या आहेत. यातील अनेक इमारतींनी चटई क्षेत्र निर्देशांकाचा (एफएसआय) अतिरिक्त वापर केला असल्यामुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी क्लस्टर योजना राबवण्यात यावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत होती; परंतु त्यावर निर्णय होत नव्हता.
मात्र राज्य सरकारने अलिकडेच जाहीर केलेल्या नव्या एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीत क्लस्टर योजनेला मंजुरी दिली असल्यामुळे ही योजना शहरात राबवण्यासाठी महापालिकेने सल्लागाराची नेमणूक करण्याचा प्रस्ताव मे महिन्यात महासभेपुढे दिला होता. मात्र सत्ताधारी भाजपने तो प्रस्ताव फेटाळून लावला. सल्लागार नेमणुकीवर सुमारे दीड कोटी रुपये खर्च होणार आहे. नव्या एकीकृत नियंत्रण नियमावलीत क्लस्टरची तरतूद आहे. त्यामुळे महापालिकेवर आर्थिक बोजा न टाकता सल्लागाराशिवाय ही योजना राबवणे शक्य आहे. सल्लागाराऐवजी क्लस्टर योजनेमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या परिणांमांचा अभ्यास करणारा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट प्रशासनाने तयार करावा, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली होती.

प्रशासकीय राजवटीमुळे आयुक्तांना अधिकार
महापालिकेत आता प्रशासकीय राजवट सुरू झाली असल्यामुळे सर्व निर्णय घ्यायचे अधिकार आयुक्तांना प्राप्त झाले आहेत. या अधिकाराचा वापर करून आयुक्तांनी क्लस्टरसाठी सल्लागार नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता निविदा प्रक्रिया राबवून सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. क्लस्टर योजनेमुळे केवळ मोडकळीस आलेल्या इमारतींचाच नाही; तर झोपडपट्ट्यांचाही विकास करणे शक्य होणार आहे. यासाठी सल्लागार नियुक्ती आवश्यक आहे. ठाणे शहरात याच पद्धतीने क्लस्टर योजना राबवली जात आहे, अशी प्रशासनाची भूमिका आहे.

सल्लागार काय करणार
क्लस्टर योजनेत अतिरिक्त एफएसआय मिळणार आहे. अशात शहराची लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे सध्याची लोकसंख्या आणि अपेक्षित लोकसंख्या, पर्यावरण आणि पायाभूत सुविधांवरील ताण, उपलब्ध एफएसआय आणि टीडीआर, वाहतूक व्यवस्था आदींचा अभ्यास करून शहरातील कोणत्या भागात क्लस्टर करणे शक्य आहे, याबाबतचा अहवाल सल्लागारकडून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सल्लागाराकडून शहराचा जीआयएस नकाशा, क्लस्टर योजनेचा सविस्तर आराखडादेखील तयार केला जाणार आहे. आराखडा तयार झाल्यानंतर त्याचे शासनस्तरावर सादरीकरण करून त्याला मान्यता घेण्याचे कामही सल्लागार करणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97245 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..