ठाकरे-शिंदेंचा असाही सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे-शिंदेंचा असाही सामना
ठाकरे-शिंदेंचा असाही सामना

ठाकरे-शिंदेंचा असाही सामना

sakal_logo
By

सुनीता महामुणकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महाविकास आघाडी सरकार असताना प्रत्येक दिवशी भाजपचे नेते भ्रष्टाचाराचा आरोप करत होते. आघाडी सरकारने सुद्धा भाजपच्या नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. सत्तांतरानंतर मात्र या प्रकरणाची दिशा बदलल्याचे दिसत आहे. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधातील तक्रारीत नुकताच सी समरी अहवाल दाखल झाला आहे. एकूणच ठाकरे आणि शिंदे यांच्यामधील हा सामना रंजक ठरणार आहे.

फोन टॅपिंग प्रकरण
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात आघाडी सरकारने दाखल केलेले फोन टॅपिंग प्रकरण शिंदे सरकारने मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग केले आहे. उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल आहे. मात्र, आता प्रकरण सीबीआयकडे गेल्यामुळे शुक्ला यांनी याचिकेत केलेली मागणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख आघाडी सरकारने केला आहे. शुक्ला यांच्याकडे असलेला पेनड्राईव्ह फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सादर केला, असा आरोप आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडे असलेला पेनड्राईव्ह पुन्हा मुंबई पोलिसांना देण्याचे निर्देश महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले होते. याविरोधात केंद्र सरकारने विशेष न्यायालयात अर्जही केला होता. मात्र, आता सत्तांतर झाल्यानंतर हा अर्जदेखील मागे घेण्यात आला आहे.

पोलिस आयुक्तांना दिलासा
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात फौजदारी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांना या प्रकरणात कारवाईपासून दिलासा दिला आहे. यामध्ये आता राज्य सरकार कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. सिंह यांच्या विरोधात अनेक तक्रारी विविध पोलिस ठाण्यांत दाखल आहेत; पण आता या तक्रारी न्यायालयात कधी दाखल होणार, हा प्रश्न आहे.

मुंबई बँक प्रकरण
प्रवीण दरेकर यांच्याविरोधात असलेली मुंबई बँकेच्या संबंधित तक्रारदेखील आता राज्य सरकारच्या कोर्टात गेली आहे. याविरोधात त्यांनीही उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र, आता सरकार बदलल्यावर त्यांनी ही याचिका मागे घेतली असून सहकार मंत्र्यांकडेच अपील करण्याची तयारी दर्शविली आहे.

हनुमान चालिसा प्रकरण
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे हनुमान चालिसा पठण प्रकरण हे आणखी एक गाजलेले प्रकरण. मुंबई पोलिसांनी यामध्ये राणा पती-पत्नीला अटकही केली होती. मात्र आता सत्तांतर झाल्यानंतर या प्रकरणात काय होणार याची उत्सुकता आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊत कारागृहात आहेत; तर पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे अडचणीत आहेत. मेट्रो कारशेड पुन्हा आरेमध्ये आल्यानंतर आघाडीचे अनेक निर्णय बदलले जाणार हे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97265 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..