रायगड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड
रायगड

रायगड

sakal_logo
By

सेवा पंधरवड्यास रक्तदान शिबिरास सुरूवात

पेण, ता. १८ (वार्ताहर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. शहरातील जैन समाज सभागृहात आयोजित रक्‍तदान शिबिरास नागरिकांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. केंद्र सरकार गोर-गरीब जनतेसाठी अनेक शासकीय योजना राबवण्यात असल्‍याचा उल्‍लेख या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी केला. शिबिरादरम्यान पेण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हेमेंद्र जैन, नगरसेवक दर्शन बाफना, युवा नेते ललित पाटील, महेश भिकावले, शेडाशी सरपंच प्रकाश कदम आदी उपस्थित होते. सेवा पंधरवड्यात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, विविध प्रकारच्या शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे, बुद्धिजीवी संमेलन आदी उपक्रम राबवण्याचा संकल्प रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
.............

नैसर्गिक शेती पद्धतीवर मार्गदर्शन
रोहा, ता. १८ (बातमीदार) ः नैसर्गिक शेती पद्धतीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. उत्तम महाडकर यांनी खांब येथील शेतकरी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये रोहा कृषी विज्ञान केंद्र प्राध्यापक डॉ. मांजरेकर, माधव गिते, जीवन आरेकर यांनीही शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांना परसबागेत बियाणे वाटप केले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी नरेश जामकर व सारिका दिघे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रसाद चव्हाण, कौशल जाधव, राहुल बोरसा, तेजस मेश्रम व ऋषिकेश भुसारा यांनी विशेष मेहनत घेतली.

रोहा : नैसर्गिक शेतीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

--------------

रोहा-पनवेल लोकलसाठी स्वाक्षरी मोहीम
रोहा, ता. १८ (बातमीदार) ः रोहा-पनवेल लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी स्वाक्षरी मोहीम सुरू केली. मोहिमेत सर्व पक्षीय व सर्व समाजातील बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य व कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण पूर्ण होऊन आता वाहतूकही सुरू झाली आहे. त्‍यामुळे रोहेकरांसाठी जास्तीच्या गाड्या वा लोकल सेवा उपलब्ध होईल, अशी आशा नागरिक बाळगून होते. मात्र याआधी ज्या गाड्या होत्या त्यांचेही थांबे रद्द करत लोकल सेवा हेही स्वप्नच राहणार? असे एकूण परिस्थितीवरून दिसून येत आहे. याप्रकरणी मध्य रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे जिल्हा सचिव अमोल पेणकर यांचे मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम अभियान रविवारपासून सुरू करण्यात आली आहे.

---------------

कर्जतमध्ये कारवर झाड कोसळले
जीवित हानी टळली
कर्जत, ता.१८ (बातमीदार) ः दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्‍कळित झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
कर्जत रेल्वे स्‍थानकात वडिलांना सोडून मुद्रे येथे घरी परतणाऱ्या यश रणदिवे यांच्या कारवर अचानक मोठे झाड कोसळले. तत्काळ ब्रेक मारून गाडी थांबवल्‍याने यश थोडक्‍यात बचावला. मात्र या अपघातात बोनेटचे नुकसान झाले.
रस्त्याच्या मधोमध झाड पडल्याने काही वेळासाठी वाहतूक बंद झाली होती. माजी नगरसेवक संतोष पाटील, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी त्वरित नगरपरिषदेच्या आपत्ती विभागाला याबाबत कळविले. त्यांनतर कामगारांनी झाडाच्या फांद्या छाटत जेसीबीच्या साह्याने झाड बाजूला केल्‍याने रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला.

फोटो :

---------

पावसाची रिपरिप सुरूच
रेवदंडा, ता. १८ (बातमीदार) ः सलग तिसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू असल्‍याने रविवारी सकाळी बाजारपेठेत शांतता होती. पर्यटकांची संख्या रोडवल्‍याने स्‍थानिक व्यावसायिकांचाही हिरमोड झाला. पावसामुळे सुपारी पिकावरील बोर्डो मिश्रण फवारणी थांबली आहे तसेच नारळाचे पाडे पाडण्याचे काम थांबले आहे. ग्रामीण भागातील भाजीपाला भिजल्‍यामुळे कुजत आहे. त्‍यामुळे आदिवासी महिलांच्या रोजगाराचे साधनच ठप्प झाले आहे.

----

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97392 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..