वाहतूक पोलिसांच्या पायघड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक पोलिसांच्या पायघड्या
वाहतूक पोलिसांच्या पायघड्या

वाहतूक पोलिसांच्या पायघड्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. १८ ः सीबीडी-बेलापूर सेक्टर १५ येथील हॉटेल आणि मद्याच्या दुकानांबाहेर नो पार्किंग असताना बिनभोभाटपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली असून आता नेरूळ-सारसोळे सिग्नल येथील एका मिठाईवाल्यासाठी चौकातील उजवा आणि डावीकडील पर्यायी मार्गच बंद करण्यात आला असल्याने पोलिसांच्या या प्रतापामुळे सिडको वसाहतींमधील नागरिक वेठीस धरले जात आहेत.
नवी मुंबई शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. मोकळा आणि सुटसुटीत असणारा पामबीच मार्गही या कोंडीतून सुटलेला नाही. नेरूळ-सारसोळे सिग्नल येथे वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने जीवघेणी वाहतूक कोंडी होत आहे. अशातच एका सुप्रसिद्ध मिठाईच्या दुकानाबाहेर नो पार्किंग असतानाही वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या चौकांत चारही बाजूंकडून येणाऱ्या वाहनांचा दररोज चक्का जाम होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशी सोसायट्यांनी या वाहनांवरील कारवाईबाबत नुकताच वाहतूक पोलिसांकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने उभ्या राहणाऱ्या या वाहनांवरील कारवाईऐवजी चौकातील पर्यायी वळणच बंद केले असल्यामुळे सिडको वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर आता पामबीच मार्गावर जाण्यासाठी राजीव गांधी उड्डाणपुलावरून वळसा घेऊन जावे लागत आहे. विशेष म्हणजे, या परिसरातील रुग्णालयात येणाऱ्या रुग्णवाहिकांनादेखील सायन-पनवेल महामार्गावर जाण्यासाठी पामबीच मार्गावरील सिग्नलला वळसा घेऊन जावे लागणार असल्याने वाहतूक पोलिसांविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.
--------------------------------
अधिकाऱ्याला मोठा ‘आधार’
पामबीच मार्गावरील दुकानांबाहेर बहुतांश ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून नो पार्किंग घोषित केले आहे. मात्र, तरीसुद्धा राजरोसपणे पामबीचवर दुकानांबाहेर वाहने उभी केली जातात. कोविडच्या आधी काही महिन्यांपूर्वी एका बड्या अधिकाऱ्याची वाहतूक विभागावर नियुक्ती झाल्यानंतर सीबीडी-बेलापूर सेक्टर १५ येथील हॉटेल, मद्य, महागड्या कपड्यांच्या दुकानांबाहेर वाहने उभी राहू नयेत म्हणून वाहतूक विभागाने कारवाईचे सत्र हाती घेतले होते. मात्र, या मार्गावरील व्यावसायिकांनी अधिकाऱ्याला ‘आधार’ दिल्यानंतर पुन्हा दुकानांबाहेर वाहने उभी राहू लागली आहेत.
--------------------------------
नेरूळ सारसोळे सिग्नलला याआधी कमी वाहतूक कोंडी होत असे; परंतु आता नवीन मिठाईची दुकाने आल्यानंतर यात वाढ झाली आहे. पोलिसांनी या दुकानांबाहेर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईऐवजी रहिवाशांचाच मार्ग बंद करून त्रास देण्याचे काम केले आहे.
- रवींद्र सावंत, काँग्रेस इंटक, जिल्हाध्यक्ष
--------------------------------
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत आगमन झाले होते. त्यावेळेस सुद्धा नेरूळ सारसोळे सिग्नल येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यानंतरही वाहतूक कोंडी होत असेल तर महापालिका कारवाई करेल.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
---------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97425 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..