उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना संपवली; रामदास कदम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Kadam
उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना संपवली

उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना संपवली; रामदास कदम

दाभोळ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख झालेल्या उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना संपवण्याचे काम केले. उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल असताना त्यांनी त्यांच्या सल्लागारांशी सल्लामसलत करून आपल्याला व आपला आमदार मुलगा योगेश याला शिवसेनेतून संपविण्याचा कट रचला, असा आरोप माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली येथे बोलताना केला. शिवसेनेचे नेते व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार योगेश कदम यांच्या वतीने शिंदे गटाच्या शिवसेना मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर विधानसभेतील शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार योगेश कदम, भांडुपचे माजी आमदार अशोक पाटील, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष केदार साठे, श्रीराम इदाते तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी रामदास कदम म्हणाले, शिवसैनिकांच्या त्यागातून शिवसेना मोठी झाली. त्यासाठी अनेक शिवसैनिकांनी अंगावर केसेस घेतल्या. उद्धव ठाकरे यांचे शिवसेना वाढवण्यासाठी काय योगदान आहे? कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली असून मुंबईतील कोकणवासीयांनी मुंबई महापालिकेची सत्ता राखण्यासाठी शिवसेनेला भरभरून दिले आहे. हा त्यांचा त्याग असताना कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणवासीयांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोकणात फिरकलेच नाहीत. वयाने ज्येष्ठ असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात फिरत होते. शिवसेनाप्रमुखांनी जे कमावले होते ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गमावले, अशी टीका कदम यांनी केली.

मातोश्रीवरील खोक्यांचे काय?
मातोश्रीवर एवढे मिठाईचे खोके येतात की त्याचे काय होते, ते ठेवतात तरी कोठे, असा प्रश्न आपल्याला पडला आहे. आपण स्वतः व आपली दोन मुले त्याचे साक्षीदार आहोत. पुढील विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव निवडून येणार नाहीत, यासाठी आपण प्रयत्न करू. पुढील विधानसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून योगेश कदम राज्यातून सर्वाधिक मतांनी निवडून येतील.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97479 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..