जुईनगर स्थानकात दुर्गंधीचे ठाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुईनगर स्थानकात दुर्गंधीचे ठाण
जुईनगर स्थानकात दुर्गंधीचे ठाण

जुईनगर स्थानकात दुर्गंधीचे ठाण

sakal_logo
By

शिल्पा नरवाडे ः सकाळ वृत्तसेवा
जुईनगर, ता. १९ ः रेल्वेस्थानक दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या स्थानकाच्या पश्चिमेला औद्योगिक, तर पूर्वेला नागरी वसाहत आहे. त्यामुळे मुंबई, तसेच उपनगरांमधील हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात; पण विविध समस्यांनी या स्थानकाला वेढले असून भटक्या कुत्र्यांचा वावर, भिकारी, फेरीवाल्यांनी स्टेशन परिसरावर कब्जा केल्यामुळे दुर्गंधीने ठाण मांडले आहे.
---------------------------------
भिकारी, बेघरांचा वावर
सिडकोच्या नियोजनामुळे नवी मुंबई परिसरामधील रेल्वेस्थानके हे नेहमीच चर्चेमध्ये राहिलेली आहेत. जुईनगर स्टेशन परिसरदेखील त्यापैकीच एक असून एका बाजूला असलेली औद्योगिक वसाहत आणि दुसरीकडे नागरी वसाहतीमुळे हजारो नागरिक या स्थानकातून प्रवास करतात; मात्र, स्थानकातील मोकळ्या जागांवर भिकारी, बेघरांनी ठाण मांडले असून स्टेशन परिसरातच प्रवाशांची अडवणूक केली जात आहे.
------------------------------------------------
गळतीमुळे नागरिक हैराण
या स्थानकावरील स्लॅबला गळती लागली असल्यामुळे पावसाळ्यामध्ये विविध अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. गळतीचे पाणी फलाटांवर पडत असल्यामुळे रेल्वे पकडताना पाय घसरून पडण्याची चिंता प्रवाशांना सतावत आहे. अनेकदा फलाटावर उभे असताना पावसाचे पाणी टपकत असल्याने ठिकठिकाणी शेवाळ तयार झाले आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांसोबत प्रवासीदेखील हैराण आहेत.
----------------------------------------
फेरीवाले, गर्दुल्ल्यांचा वावर
स्टेशन परिसरामध्ये फेरीवाल्यांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. संध्याकाळी या फेरीवाल्यांमुळे स्थानकाच्या भुयारी मार्गात कोंडी होत आहे. तसेच स्टेशन परिसरामध्ये गर्दुल्ल्यांचा वावर असून तिकीट काउंटर परिसरामध्ये असलेल्या वावरामुळे महिला प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.
-------------------------------------------------------------------
पिचकाऱ्या, नावांमुळे भिंतींचे विद्रुपीकरण
सध्या तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. मात्र हेच तरुण आजूबाजूचा परिसर खराब करतात. स्टेशन परिसरातील भिंतींवर गुटखा खाऊन थुंकल्याने स्टेशनच्या भिंती खराब झाल्या आहेत. तसेच स्टेशनच्या पायऱ्यांवर प्रेमी युगल बसलेले असून भिंतींवरील विविध अक्षरांमधील नावांनी विद्रुपीकरण केले आहे.
---------------------------------------------------
भंगार वाहनांमुळे आरोग्याला धोका
स्टेशनला जाताना अनेक ठिकाणी टाईल्स तुटलेल्या आहेत. तसेच स्टेशनच्या बाहेर पडताच खराब झालेली चारचाकी, दुचाकी वाहने उभी केलेली आहेत. भंगारात पडलेल्या या वाहनांमुळे साप, विचू तसेच पावसाच्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.
---------------------------------------
जुईनगर स्टेशनला नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. मात्र इथे लिकेज, गर्दुल्ले, भटके कुत्रे, भिकारी अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे सिडको प्रशासनाने लक्ष द्यावे.
-श्रीकांत मावळे, प्रवासी
-------------------------------
जुईनगर स्टेशनला लागूनच ठाणे-बेलापूर मार्ग आहे. त्यामुळे इथे प्रवाशांची वर्दळ असते. स्टेशनला जाणाऱ्या रस्त्याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे इथे टीसी असणे आवश्यक आहे.
-दीपक मेंढे, प्रवासी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97527 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..