क्षयरोग रुग्णांच्या मदतीला २५ निक्षय मित्रांची फळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षयरोग रुग्णांच्या मदतीला २५ निक्षय मित्रांची फळी
क्षयरोग रुग्णांच्या मदतीला २५ निक्षय मित्रांची फळी

क्षयरोग रुग्णांच्या मदतीला २५ निक्षय मित्रांची फळी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १९ : जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत मोहीम हाती घेण्यात येते. क्षयरोग रुग्णांवर औषधोपचार सुरू असताना ५०० रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. मात्र, त्या सोबतच त्या रुग्णाला पोषक आहाराचीदेखील आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन, सरकारकडून अशा रुग्णांच्या पोषणाची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले असता, ठाणे जिल्ह्यातील रुग्णांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी २५ निक्षय मित्रांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून ४६ क्षयरोग रुग्णांना पोषण आहाराची मदत देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रुग्‍णांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे.
क्षयमुक्त भारत हे उद्दिष्ट गाठण्याकरिता औषधांची योग्य मात्रा, नियमित औषधोपचारासोबतच पोषक आहाराचीही गरज आहे. त्याकरिता केंद्र सरकारतर्फे प्रत्येक नोंदणी झालेल्या क्षयरुग्णांच्या बँक खात्यात उपचार सुरू असेपर्यंत दरमहा ५०० रुपये हे निक्षय पोषण योजनेंतर्गत जमा केले जातात. याव्यतिरिक्त क्षयरुग्णांना पोषण आहाराकरिता समाजातील स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच लहान-मोठ्या कंपन्या यांनी पुढे येऊन किमान एक वर्षाकरिता क्षयरुग्णांच्‍या पोषण आहाराची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत, ठाणे जिल्ह्यातील २५ निक्षय मित्रांची निक्षय पोर्टलवर नोंदणी झाली आहे. तसेच क्षयरोग रुग्णांशी दूरध्वनीवर संवाद साधून त्यांना पोषण आहारासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यानुसार दोन हजार ३५६ जणांनी पोषण आहाराची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार २५ निक्षय मित्रांच्या मदतीने सुरुवातीला ४६ क्षयरुग्णांना पोषण आहाराची मदत करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच टप्‍प्याटप्‍प्याने उर्वरित रुग्णांनादेखील मदत पोहोचविण्यात येणार असल्याची माहितीही आरोग्‍य विभागाकडून देण्यात आली आहे.
क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट साध्य
ठाणे जिल्ह्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत सार्वजनिक रुग्णालयांमधून दोन हजार ४०० व खासगी रुग्णालयांमधून ४०० असे दोन हजार ८०० क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत दोन हजार ५९९ क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
निक्षय मित्रांचा सन्‍मान
शशिकांत जैतू म्हाळुंगे, अमोल कंदू भेरे, अनिकेत म्हात्रे, नीलेश निरकर, मनीषा देसाई, रुपसिंग नारायणजी ढाल, उमर दादामिया इंजिनिअर, किरण शंकर भोईर, नयन मुठे, संत क्लरेत मर्सी फाऊंडेशन, डॉ. गीता काकडे, बळाप्पा बिराजदार यांचा राज्‍यपालांच्‍या हस्‍ते नुकताच सन्‍मान करण्‍यात आला.
......................................
आरोग्य विभागाचे आवाहन
ठाणे जिल्ह्यातील ज्या सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधी यांना क्षयरोग रुग्णांसाठी पोषण आहाराची मदत करावयाची असेल अशा संस्था, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग विभागाकडून करण्यात आले आहे.
..................................
कोट :-
जास्तीत जास्त लोकांनी निक्षय मित्र म्हणून नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच रुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहारासाठी सहकार्य करावे.
- डॉ. गीता काकडे-खरात, सहायक संचालक, आरोग्य विभाग.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97538 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..