खड्डयांमुळे आजारांना निमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डयांमुळे आजारांना निमंत्रण
खड्डयांमुळे आजारांना निमंत्रण

खड्डयांमुळे आजारांना निमंत्रण

sakal_logo
By

वाशी, ता. १९ (बातमीदार) ः गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. जवळपास तीन आठवड्यांपासून पाऊस सुरू असल्यामुळे नवी मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यात ठाणे-बेलापूर महामार्गासोबत शहरातील गावठाणांकडे जाणाऱ्या जोड रस्त्यांचादेखील समावेश असून खड्ड्यांमुळे आजारांना निमंत्रण दिले जात आहे.
ठाणे ते बेलापूर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सिग्नलजवळ काही महिन्यांपूर्वी गटार व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते, परंतु या कामाचीदेखील पावसाने पोलखोल केली आहे. साठेनगर येथील रस्त्यावर व गटाराच्या जाळ्यामध्ये मातीचा गाळ साचत असल्याने त्या ठिकाणी तळे होत आहे. रबाळे पोलिस ठाण्यानजीक सिग्नलजवळील रस्ता हा वाहतूक कोंडीने वेढलेला असताना पावसाळ्यात साचणारे पाणी व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक प्रकारची कसरतच आहे. नेरूळ एलपी ते शिरवणे या मार्गावरही उड्डाणपूल आणि त्या खालील अंतर्गत महामार्गावर खड्डे पडले आहे; तर ऐरोली गोठीवली येथील अंतर्गत रस्त्यांशी संमातर असणाऱ्या रस्त्यावरदेखील खड्डे पडलेले आहेत. हीच अवस्था तुर्भे सर्कलजवळील रस्त्याची झाली आहे. या ठिकाणी नवीन जोड पुलाचे काम सुरू असल्यामुळे कोंडी होत असताना आता रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेदेखील वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
---
महापालिकेची तात्पुरती मलमपट्टी
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सध्या शहरातील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे; मात्र भरपावसातच हे खड्डे भरले जात असल्याने रस्त्यांची अवस्था पूर्ववत होत आहे. गणेशोत्सव काळात गणेशभक्तांची गैरसोय टळावी म्हणून महापालिकेकडून खड्डे बुजवण्यात आले होते, पण आता पुन्हा खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
----
सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पालिकेकडून या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
---
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणेदेखील नकोसे वाटते. खड्ड्यामुळे कंबरदुखी वाढली असून वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.
- सूरज भांडे, वाहनचालक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97541 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..