प्रियंका राऊत हत्या प्रकरणी ६ जण अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रियंका राऊत हत्या प्रकरणी ६ जण अटकेत
प्रियंका राऊत हत्या प्रकरणी ६ जण अटकेत

प्रियंका राऊत हत्या प्रकरणी ६ जण अटकेत

sakal_logo
By

पनवेल, ता. १९ (वार्ताहर) : पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गेल्या गुरुवारी रात्री घडलेल्या प्रियंका रावत या महिलेच्या हत्या प्रकरणाचा खांदेश्वर पोलिसांनी छडा लावल्यानंतर पोलिसांनी या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या सहा जणांना अटक केली आहे. यात प्रियंकाचा पती देवव्रतसिंग रावत, त्याची प्रेयसी निकिता मतकर तसेच सुपारी किलरला हत्येची सुपारी देणारा निकिताचा साथीदार प्रवीण घाडगे तसेच तिघे सुपारी किलर अशा एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
या हत्येच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला होता. या तपासादरम्यान खांदेश्वर पोलिसांनी संशयावरून प्रियंकाचा पती देवव्रतसिंग याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर त्याचे निकिता मतकर हिच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देवव्रतसिंग व निकिता या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची स्वतंत्र चौकशी केल्यांनतर निकिता मतकर हिने सदरची हत्या घडवून आणल्याचे कबूल केले.
त्यानुसार पोलिसांनी देवव्रतसिंग, निकिता मतकर आणि प्रवीण घाडगे या तिघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करून बुलडाणा येथून रोहित ऊर्फ शिव ऊर्फ रावत राजू सोनोने (वय २२), दीपक दिनकर लोखंडे (वय २५) आणि पंकज नरेंद्रकुमार यादव (वय २६) या तिघांना बुलडाणा येथून अटक केली. हे तिघेही सुपारी किलर मुंबईत सराईत गुन्हेगार असून पाचोरा येथील एका फायरिंगच्या गुन्ह्यात तिघे आरोपी फरार होते.

प्रेमसंबंधांतून हत्या
पनवेलमधील विहिघर येथे राहणारा मृत प्रियंकाचा पती देवव्रतसिंग रावत याचे निकिता मतकर (वय २४) हिच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांतून देवव्रतसिंग आणि निकिता या दोघांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात मंदिरात लग्नदेखील केले होते. या दोघांमधील प्रेमसंबंधांची माहिती प्रियंका रावत हिला समजली होती; मात्र देवव्रतसिंग व निकिता या दोघांच्या प्रेमात प्रियंका अडसर ठरत असल्याने तिचा कायमचा काटा काढल्यास देवव्रतसिंगसोबत आपल्याला पत्नी म्हणून कामयचे राहता येईल असा विचार निकिताने केला होता. याच विचारातून निकिता व देवव्रतसिंग या दोघांनी प्रियंकाची सुपारी देऊन हत्या करण्याचा निर्णय घेतला.
निकिता मतकर ही प्रवीण घाडगे या क्लासचालकाकडे टीचर म्हणून काम करत असल्यामुळे तिने प्रवीण घाडगे याला प्रियंकाची हत्या करण्यासाठी सुपारी किलरला शोधण्यास सांगितले होते. त्यानुसार घाडगे याने बुलडाणा येथील सराईत गुन्हेगार असलेल्या तीन सुपारी किलरना तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती. तसेच त्यातील दोन लाख रुपयांची रक्कम त्यांना देऊन हत्येनंतर एक लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर प्रियंकाचा पती देवव्रतसिंग याने प्रियंकाच्या प्रत्येक हालचालीची माहिती सुपारी किलरला दिल्यानंतर तिघा सुपारी किलरने गेल्या गुरुवारी प्रियंका कामाला असलेल्या ठाण्यातील तिच्या कार्यालयापासून तिच्यावर पाळत ठेवली होती. तसेच तिचा ठाण्यापासून पनवेलपर्यंत लोकलमधूनदेखील पाठलाग केला. त्यानंतर प्रियंकाच्या गळ्यावर वार करत पलायन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97607 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..