Crime News : मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा मेसेज खोटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime Kidnapped
मुलांचे अपहरण झाल्याच्या अफवा व्हायरल

मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा मेसेज खोटा

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांच्या चोऱ्या होत असल्याच्या अफवा पसरवण्याच्या घटना मुंबईत एकामागून एक समोर येत आहेत. मुंबईतील मरोळ परिसरात असलेल्या कला विद्यामंदिर शाळेतील तीन मुलांचे अपहरण झाल्याचा दावा शिक्षकाने एका ऑडिओ क्लिपमध्ये केला होता. काही जणांनी मुलांना गाडीत बसवले असल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता शाळेतून एकाही मुलाचे अपहरण झाल्याचे आढळले नाही. त्यानंतर संबंधित ऑडिओ क्लिप मुलांना शिकवणाऱ्या एका महिलेने व्हायरल केल्याचे तपासात उघड झाले.

कांजूरमार्गमधील रहिवासी सोसायटी आणि विक्रोळीच्या शाळेतूनही मूल चोरीला गेल्याची चर्चा सोशल मीडियावरून पसरली होती; परंतु तीही अफवा ठरली. बनावट क्लिप आणि ऑडिओपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. काही दिवसांत देशाच्या इतर भागांप्रमाणेच मुंबईतही बालकांच्या चोरीच्या अफवा पसरल्या आहेत; परंतु कोणत्याही दाव्यात तथ्य नाही. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मथुरामधील चार साधूंना बालचोरीच्या संशयावरून सांगलीत बेदम मारहाण करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसही अलर्ट मोडवर आहेत.

अंधेरीतही अफवा
अशाच प्रकारे अंधेरी परिसरातून निशांत चौरसिया नावाच्या ११ वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची अफवा पसरली होती. पोलिसांनी घटना घडल्याचा दावा केल्या गेलेल्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली असता मुलगा एकटाच असून कोणीही त्याच्याजवळ आले नसल्याचे आढळले. मुलाच्या वडिलांनीही काही जणांनी गैरसमजातून अफवा पसरवल्याचे सांगितले. अंधेरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संताजी घोरपडे म्हणाले, की सोमवारी काही जणांनी मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी पसरली होती; परंतु तपासात ती खोटी असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97634 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..