नेरूळ स्थानकात बेघरांचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरूळ स्थानकात बेघरांचा वावर
नेरूळ स्थानकात बेघरांचा वावर

नेरूळ स्थानकात बेघरांचा वावर

sakal_logo
By

वैभवी शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
नेरूळ, ता. २० ः सुयोजित शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. त्याच अनुषंगाने सिडकोनेदेखील येथील रेल्वे स्थानकांची निर्मिती केली; मात्र या स्थानकांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अवकळा आली आहे. दळणवळणाच्या दृष्टीने नवी मुंबईतील महत्त्वाचे स्थानक म्हणून ओळख असलेल्या नेरूळ स्थानकाचीदेखील अशीच अवस्था झाली असून फलटांवर बेघरांचा वावर वाढल्याने नेरूळ रेल्वे स्थानकात प्रवाशांमध्ये असुरक्षितेची भावना आहे.
---
महिला प्रवाशांना भिकाऱ्यांचा त्रास
कोरोना काळत नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांच्या परिसरात भिकारी, बेघरांनी फलाटवर बस्तान बसवल्याचे चित्र दिसायचे. हीच परिस्थिती आजही नेरूळ स्थानकावर पाहावयास मिळत आहे. दिवसभर स्थानक परिसर आणि फलाटांवर भिकाऱ्यांचा वावर असून लहान मुलांचा वापर करून महिलांना त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत.
---
स्थानक परिसरात अंधाराचे राज्य
रेल्वे स्थानकांतील दिवे बंद असल्याने रेल्वे स्थानकाबाहेर अंधार आहे. नेरूळ स्थानक पश्चिम परिसरात स्थानकाबाहेर दारूचे दुकान आहे. रात्रीच्या वेळी अनेक मद्यपींचा वावर असतो. अशातच स्थानक परिसरातील पथदिवेदेखील बंद असल्याने अंधारातच प्रवाशांना जावे लागत आहे. हीच परिस्थिती रिक्षा स्टॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्याची असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
---
पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
नेरूळ पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला स्थानकाच्या बाहेर व रेल्वे पुलावर अनधिकृत भाजीवाल्यांनी
अतिक्रमण केले आहे. महापालिकेकडून या फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते; मात्र पुन्हा पदपथांवर कब्जा करून व्यवसाय केले जात असल्यामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छतेमुळे स्थानक परिसराला बकाल स्वरूप आले आहे.
---
प्रसाधनगृहाच्या स्वच्छेतेकडे दुर्लक्ष
नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे पुलाचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार केले जात आहेत. यामुळे एखाद्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय स्थानकातील प्रसाधनगृहदेखील अस्वच्छ असून पावसाळ्यात स्थानकात अनेक ठिकाणी छताचे पाणी गळत आहे. या स्थानकात प्रवाशांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे, परंतु काही वाहने अनेक दिवसांपासून पार्किंगमध्येच धूळ खात पडून आहेत.
---
रात्रीच्या वेळी रेल्वे परिसरात, स्थानक परिसरात अंधार असल्यामुळे भीती वाटते. तसेच स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी व्यवसाय मांडले असल्याने नाहक गर्दी होत आहे.
- लक्ष्मी चौधरी, महिला
-----------------------------
स्थानकातील पंखे अनेकदा बंदच असतात. तसेच बेघर व भिकाऱ्यांमुळे स्थानक परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे स्थानकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
- श्वेता माने, विद्यार्थी
-------------------------------------
नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच सर्व स्थानकांतील प्रवाशांशी निगडित समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार आहे.
- प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97639 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..