रेल्‍वे स्‍थानकात प्रवाशांची घूसमट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्‍वे स्‍थानकात प्रवाशांची घूसमट
रेल्‍वे स्‍थानकात प्रवाशांची घूसमट

रेल्‍वे स्‍थानकात प्रवाशांची घूसमट

sakal_logo
By

कल्याण, ता. २१ (बातमीदार) : कल्याण रेल्वेस्थानकांमधील पुलावर दोन्ही बाजूने लावण्‍यात आलेल्‍या जाहिरात फलकांमुळे तेथे येणाऱ्या प्रवाशांची घुसमट होत आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही परिस्‍थिती जैसे थे असून, पुलावर मोठी दुर्घटना घडल्यावर रेल्वे प्रशासन जागे होणार का, असा सवाल केला जात आहे.

कल्याण रेल्वेस्थानक देशातील तिसरे गर्दीचे रेल्वेस्थानक आहे. या स्थानकामधून मेल आणि लोकलने प्रतिदिन सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. मुंबईमधील अंधेरी, एल्फिन्स्टन आणि सीएसएमटी टर्मिनस रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्‍या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने बहुतांश रेल्वे स्थानकांमध्‍ये नव्याने पादचारी पूल, उड्डाण पूल बनविले आहेत. त्‍याचप्रमाणे कल्याण रेल्वेस्थानकातही नव्याने पादचारी पूल बनविण्‍यात आला आहे.

कल्याण रेल्वेस्थानकात एकूण सात फलाट असून स्टेशनच्या मध्यभागी कल्याण पूर्व-पश्चिम असा मोठा पूल आहे. सकाळी आणि संध्याकाळी लोकल आणि मेल गाडी पकडण्यासाठी फलाटावर प्रवाशांची गर्दी होत असल्याने अनेक जण त्या पुलाचा वापर करत आहेत. कल्याण पूर्व आणि पश्चिममधून रेल्वेस्थानक गाठणे रेल्वे प्रवाशांना जिकीरीचे झाले आहे.
--------------------
पादचारी पूल कधी मोकळा श्वास घेणार?
सध्या रेल्वेने उत्‍पन्नाच्या नावाखाली अनेक पुलांवर दोन्ही बाजूने जाहिरातीचे पोस्टर लावले आहेत. मात्र, त्यामुळे प्रवाशांची घुसमट होत असून पादचारी पूल कधी मोकळा श्वास घेणार, असा सवाल उपस्‍थित केला जात आहे. अचानक पाऊस येत असल्याने अनेक प्रवासी त्या पुलाचा आधार घेतात. मात्र, तेथे लावलेल्‍या पोस्टर्समुळे अनेक अडचणी येत असल्याच्‍या तक्रारी प्रवासी वर्गाकडून केल्या जात आहेत. दुसरीकडे सरकते जिनेही अनेक वेळा बंद असल्याने ज्‍येष्ठ नागरिकांना पायऱ्या चढत त्या पुलावर यावे लागते; मात्र त्या पुलावरील जाहिरात फलकांमुळे घुसमट होत असल्याची तक्रार कल्याण पूर्व ज्‍येष्‍ठ नागरिक संघाने केली आहे.
------------------------------------
कोट
कल्याण रेल्वे स्टेशनमधील ही नेहमीची समस्या असून, ती लवकरात लवकर दूर करावी.
- प्रथमेश सावंत, अध्यक्ष, जाणीव रेल्वे प्रवासी संघटना.
----------------------------
जाहिरात फलकाबाबतचा विभाग वेगळा आहे. मात्र, प्रवाशांना भेडसावणारी समस्या त्या विभागाला कळवू.
- रेल्वे अधिकारी, कल्याण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97682 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..