निरोगी आयुष्यासाठी सायकल चालवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरोगी आयुष्यासाठी सायकल चालवा
निरोगी आयुष्यासाठी सायकल चालवा

निरोगी आयुष्यासाठी सायकल चालवा

sakal_logo
By

भाईंदर, ता. २० (बातमीदार) : हवेतील प्रदूषण कमी व्हावे व लोकांना सायकल चालवण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मिरा-भाईंदर महापालिका सायकल ट्रॅक बांधणार आहे. सुमारे एक किलोमीटरचा हा ट्रॅक असून घोडबंदर येथे बांधण्यात आलेल्या साठ मीटर रस्त्यावर तो तयार केला जाणार आहे. सध्या तो प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात येणार आहे.
रस्त्यावर वाढत असलेल्या वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. वाहनांची संख्या कमी व्हावी व लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून मिरा-भाईंदर महापालिकेने लोकांना सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महामार्गालगत घोडबंदर नाक्यावरून नव्याने बांधण्यात आलेल्या साठ मीटर रस्त्यावर सायकल ट्रॅक बांधण्यात येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर एक किलोमीटर लांबीचा हा ट्रॅक असणार आहे. लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून अन्य ठिकाणीदेखील तो बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
पर्यावरण रक्षणासाठी महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगातून येत्या पाच वर्षांत ८१ कोटी रुपये मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात त्यातील ३१ कोटी महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या निधीतून महापालिका पर्यावरण रक्षणासाठी विविध उपाययोजना करत आहे. यात १४ कोटी रुपये ई बस खरेदीसाठी देण्यात आले आहेत. हवेतील धूळ कमी करण्यासाठी महापालिका यंत्रदेखील खरेदी करणार आहे, तसेच उत्तन येथील कचराभूमीवरील प्रदूषण कमी करण्यासाठीदेखील या निधीचा वापर केला जाणार आहे. त्याच निधीतून सायकल ट्रॅकसाठी ७० लाख रुपये महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. या विभागाने त्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्याला आयुक्त दिलीप ढोले यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. लवकरच त्याची निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ठाणे महानगरपालिकेने बांधलेल्या सायकल ट्रॅकच्या धर्तीवर हा सायकल ट्रॅक बांधण्यात येणार आहे.
----------------
कोरोनानंतर तंदुरुस्तीबाबत जागरूकता
कोरोनानंतर लोकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत बऱ्यापैकी जागरूकता आली आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्यांमध्ये सायकल चालवण्याची आवड निर्माण झाली आहे. सकाळच्या वेळी अनेक जण सायकल चालवत असताना दिसत असतात; मात्र शहरात असलेले अरुंद रस्ते व त्यावर असलेली वाहनांची वर्दळ यामुळे सायकल चालवणे तसे त्रासदायक ठरत आहे. त्यामुळेच महापालिकेने हा सायकल ट्रॅक बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
....
सोबत सायकल ट्रॅकचे संकल्पचित्र पाठवत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97703 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..