सायबर गुन्हेगारी पोलिसांसमोर नवीन आव्हान.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर गुन्हेगारी पोलिसांसमोर नवीन आव्हान..
सायबर गुन्हेगारी पोलिसांसमोर नवीन आव्हान..

सायबर गुन्हेगारी पोलिसांसमोर नवीन आव्हान..

sakal_logo
By

सायबर गुन्हेगारीविरोधात हवे हत्तीचे बळ!
विशेष पोलिस दल अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : सायबर गुन्ह्यांचे नवे आव्हान मुंबई पोलिसांसमोर उभे राहिले आहे. ऑनलाईन फसवणूक असो वा आर्थिक घोटाळे किंवा ब्लॅकमेलिंगसारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी जानेवारी ते जुलैदरम्यान शहरात एकूण २,९५३ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत १,६३२ गुन्हे नोंदवले गेले होते. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यासाठीचे विशेष पोलिस दल अधिक सक्षम आणि अद्ययावत करण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के सायबर गुन्हे अधिक नोंदवले गेल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे. आकडेवारीनुसार ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे जास्त आहेत. त्यानंतर क्रेडिट-डेबिट कार्ड फसवणूक, अश्लील ई मेल, एसएमएस आणि सोशल मीडिया पोस्ट यांचा समावेश होतो. मुंबईत नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालात गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईत २०२१ मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये १८ टक्के वाढ झाली. एकूण २,८८३ गुन्ह्यांची नोंद केली गेली. २०२१ च्या तुलनेत २०२२ मधील पहिल्या सात महिन्यांत सायबर गुन्ह्यांच्या नोंदीत दोन टक्के वाढ झाली. तज्ज्ञांच्या मते काही लेखी तक्रारींचे गुन्ह्याच्या नोंदीत रूपांतर झालेले नाही.

फसवणुकीच्या गुन्ह्यांची आकडेवारी
एकूण फसवणूक ः १३२१
ऑनलाईन १३२१
क्रेडिट-डेबिट कार्ड ९१६
अश्लील ई मेल/एसएमएस/एमएमएस ः २३२
ऑनलाईन खरेदी ः १२२
कर्ज ः ७६
नोकरी ः ६७
कस्टम/गिफ्ट ः ४६
बनावट वेबसाईट ः ४३
गुंतवणूक ः ४२
मेट्रोमोनियल वेबसाईट ः १९
क्रिप्टो चलन ः १२

प्रतिदिन सहा जणांची ऑनलाईन फसवणूक
२९५३ गुन्ह्यांमध्ये सर्वात जास्त १३२१ प्रकरणे ऑनलाईन फसवणुकीची आहेत. ३५ टक्के गुन्हे अशा फसवणुकीचे होते. मुंबईत रोज सरासरी सहा ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणे नोंदवली जातात. मुंबई पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीच्या १३२१ प्रकरणांचे अकरा श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे.

ऑनलाईन ब्लॅकमेलिंगचे नवे शस्त्र
यंदा ऑनलाईन ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. बनावट सोशल मीडिया प्रोफाईल/मॉर्फिन ईमेल/एसएमएस करून ऑनलाईन धमकी देण्याची नवीन पद्धत गुन्हेगारांनी अवलंबली आहे. आॅनलाईन ब्लॅकमेलिंगची ७७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यांपैकी सेक्सटॉर्शनचे ५५, हॅकिंग ब्लॅकमेलिंगचे ४३ आणि पोर्नोग्राफी ब्लॅकमेलिंगचे २० गुन्हे दाखल आहेत.

गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण चिंताजनक
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार यंदा जानेवारी ते जुलैदरम्यान शहरात एकूण २,९५३ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी केवळ १४१ प्रकरणांची उकल करत १९८ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पहिल्या सहा महिन्यांत सायबर फसवणुकीच्या चार टक्के प्रकरणाचा छडा पोलिसांना लावण्यात यश आले आहे. जूनमध्ये सर्वात जास्त २९ प्रकरणांचा छडा लागला. जानेवारीत सर्वात कमी तीन प्रकरणे अंतिम टप्प्यात नेण्यात पोलिसांना यश आले.

उपाय काय?
सायबर गुन्हे रोखण्यासाठी इंटरनेटच्या फायद्या-तोट्यांविषयी तरुणाईमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. त्यासाठी विशेष कार्यक्रम तयार करायला हवेत. सायबर पोलिस दल अधिक कार्यक्षम करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ऑनलाईन सर्फिंग करताना नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी काही मूलभूत नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांनी सुचवलेले उपाय
- अनोळखी नंबरवरून आलेले व्हिडीओ कॉल घेऊ नका
- अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका
- घोटाळेबाजांच्या अथवा ऑनलाईन ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांच्या मागण्या मान्य करू नका. तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याला कळवा
- आपल्या सोशल मीडियावर असलेल्या डाटा-चित्रांचे संरक्षण करा
- अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
- ऑनलाईन बँकिंगचे तपशील देऊ नका

स्वतंत्र सायबर न्यायालय हवे
सायबर गुन्ह्यांची उकल कमी होण्यामागे पोलिस, न्यायव्यवस्था आणि सरकार अशा तिन्ही समस्या आहेत. सायबर आणि सामान्य कायदा-सुव्यवस्था राखणारे पोलिस वेगळे असायला हवेत. न्यायाधीश प्रशिक्षित आहेत. विशेषत: मुंबईत सायबर गुन्हेगारी प्रकरणे हाताळण्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी सरकार अजूनही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे, त्याचा वापर आणि उत्पादनाची समज पोलिसांमध्ये कमी आहे. महाराष्ट्राने प्रशिक्षण उपक्रम सुरू केले आहेत; परंतु संगणक अभियंता किंवा संगणक विज्ञान पदवीधरांना पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त केल्यास समस्या जलद सोडवता येतील, असे मत वकील आणि सायबरतज्ज्ञ ॲड. प्रशांत माळी यांनी व्यक्त केले.

सायबर पोलिस आणि शैक्षणिक संस्थांनी इंटरनेटच्या फायद्या-तोट्यांविषयी तरुणांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम तयार करायला हवेत. सायबर पोलिस दलाला अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरने अद्ययावत करण्याची गरज आहे, जेणेकरून ते सायबर गुन्हेगारांच्या वरचढ होऊ शकेल.
- डी. शिवनंदन, माजी आयपीएस अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97736 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..