वसईतही रंगणार शिंदे-ठाकरे सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईतही रंगणार शिंदे-ठाकरे सामना
वसईतही रंगणार शिंदे-ठाकरे सामना

वसईतही रंगणार शिंदे-ठाकरे सामना

sakal_logo
By

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा

विरार, ता. २१ : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे शिवसेना विरोधात शिंदे शिवसेना असा सामना राज्यात बघायला मिळत आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले, परंतु मूळचे भाजपचे खासदार राहिलेल्या खासदार राजेंद्र गावित यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांची पहिली पत्रकार परिषद मंगळवारी झाली. त्या पत्रकार परिषदेच्या बाजूला ‘खाऊन खाऊन ५० खोके; माजलेत बोके’ अशा आशयाच्या निषेध फलकांनी वसई-विरारकरांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे आता राज्यात सुरू असलेल्या शिंदे-ठाकरे गटाचा सामना वसई-विरारमध्येही रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
खासदार गावित यांनी वसई तालुक्यातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद ‘खाऊन ५० खोके; माजलेत बोके’ अशा आशयाच्या झळकणाऱ्या फलकांनी गाजली. या फलकांनी पत्रकारांसह वसई-विरारकरांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे हे फलक का आणि कुणी लावले, याचा उलगडा झालेला नसला तरी या माध्यमातून खासदार राजेंद्र गावित यांनी आयोजित केलेली पत्रकार परिषद आणि त्यांच्या कृतीचा निषेध करण्यात आला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
.....
गावित नेमके कुणाचे?
या पत्रकार परिषदेला गावित यांच्या सभोवती शिवसेनेपेक्षा भाजपचेच कार्यकर्ते जास्त दिसून आल्याने गावित यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेचे निमंत्रण शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) नीलेश तेंडोलकर यांच्या माध्यमातून देण्यात आले होते. त्यामुळे गावित नेमके कुणाचे, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. शिवसेनेतील फुटीच्या निमित्ताने राजेंद्र गावित वसईत भाजपला बळ देत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे राजेंद्र गावित नक्की कोणाचे, याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळू शकणार आहे.
.....
पुन्हा घरवापसीचे संकेत
एका बाजूला पालघरच्या जागेवर भाजपने दावा दाखल केल्याने गावित यांची भाजपबरोबरची सलगी म्हणजे पुन्हा घरवापसी असल्याचे संकेत मिळत आहेत. खासदार राजेंद्र गावित यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, भाजप, शिवसेना असा राहिला आहे; पण शिवसेनेपेक्षा त्यांचा कल भाजपकडेच जास्त आहे. गावित यांच्याकडून त्यांचे भाजपप्रेम लपून राहिले नाही. त्यामुळे पत्रकार परिषदेतही ते दिसून आल्यानेच भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी झुकते माप दिल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97824 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..