नवरात्रोत्सवावर महागाईचे सावट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सवावर महागाईचे सावट
नवरात्रोत्सवावर महागाईचे सावट

नवरात्रोत्सवावर महागाईचे सावट

sakal_logo
By

वाशी, ता. २१ (बातमीदार) ः गणेशोत्सवानंतर आता साऱ्यांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. अवघ्या पाच दिवसांवर उत्सव आल्याने मूर्ती कार्यशाळेत मूर्तिकारांची लगबग सुरू आहे; पण यंदा गणेशमूर्तीपाठोपाठ देवींच्या मूर्तींनाही महागाईची झळ पोहोचली असून दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नवरात्रोत्सवाला मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने मंडळांबरोबर मूर्तिकारांची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. दोन वर्षांच्या कोरोनाच्या काळानंतर भाविकांमध्ये जल्लोषाचे, चैतन्याचे वातावरण आहे. मंडप बांधणीपासून सजावटीपर्यंतची सर्व तयारी उत्साहात सुरू आहे. सध्या महागाई प्रचंड वाढली असून, त्याची झळ देवीच्या मूर्तींना बसल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. देवीची मूर्ती घडवताना अनेक बारकावे असतात. गणेशमूर्तीपेक्षा देवीच्या मूर्तीचे काम खूप असते. त्यामुळे कारागीर तुलनेने अधिक लागतात. त्यांचे मानधन, पीओपीचा वाढलेला खर्च, वाहतूक खर्च, इमिटेशन ज्वेलरीमध्ये झालेली वाढ यामुळे मूर्तीच्या दरवाढीत झाल्याचे मूर्तिकार साजन म्हात्रे यांनी सांगितले. यंदा दीड ते साडेसात फूट उंचीच्या मूर्ती बनविल्या जात आहेत. दोन वर्षे चार फुटांच्या उंचीपर्यंतच मूर्ती खरेदी केल्या होत्या. यावर्षी दीड फूट उंचीची मूर्ती १८००, तर साडेसात फूट उंचीची मूर्ती ४० हजारांपर्यंत असल्याचे मूर्तिकार म्हात्रे यांनी सांगितले.
----------------------------------
मूर्तिकार, कारागिरांची तारेवरची कसरत
अनंत चतुर्दशीपासून केवळ १५ दिवसच मूर्तीच्या कामासाठी मिळाल्याने वेळेत मूर्ती बनवून देण्यासाठी कारागिरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मूर्तिकार देवीची विविध रूपे साकारत असून, अंबे मातेच्या रूपातील देवीला अधिक मागणी असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. घरगुती नवरात्रोत्सवासाठी चार फुटांपर्यंत; तर सार्वजनिक उत्सवासाठी सात फुटांपर्यंत मूर्तीचे बुकिंग आले आहे. कोरोनाकाळानंतर यंदा जोरदार नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
-------------------------------------
सुकवण्याची लागली चिंता
मूर्तीच्या कामात पावसाने खोडा घातला असून, मूर्ती सुकविण्यासाठी मूर्तिकारांना विविध युक्त्या लढवाव्या लागत आहेत. पावसाळी दिवसांत मूर्ती सुकविणे हे मोठे आव्हान मूर्तिकारांसमोर आहे. मूर्तिकार हॅलोजन आणि २४ तास पंखे सुरू ठेवून मूर्ती सुकवत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97827 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..