थेट सरपंच निवड ठरतेय पॅनल प्रमुखांची डोकेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थेट सरपंच निवड ठरतेय पॅनल प्रमुखांची डोकेदुखी
थेट सरपंच निवड ठरतेय पॅनल प्रमुखांची डोकेदुखी

थेट सरपंच निवड ठरतेय पॅनल प्रमुखांची डोकेदुखी

sakal_logo
By

थेट सरपंच निवड ठरतेय पॅनेलप्रमुखांची डोकेदुखी
शहापूर तालुक्यातील चित्र; सरपंचपदासाठीच उमेदवारांची होतेय मागणी

खर्डी, ता. २१ (बातमीदार) ः शहापूर तालुक्यात १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांमधून थेट सरपंचपदाची निवडणूक पहिल्यांदाच होत आहे; परंतु तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायती या पेसाअंतर्गत येत असल्याने सर्वच सरपंच हे अनुसूचित जमातीकरिता राखीव आहेत. तालुक्यात ७९ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत असून सर्वच ग्रामपंचायतीत सरपंच निवडणुकीसाठी ७ वी पास असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार फक्त सरपंचपदासाठी उमेदवारी मागत आहेत. त्यामुळे सरपंचपदाची उमेदवारी कोणाला द्यायची, कोणाला डावलायचे व कोणाला कुठल्या पदाचे, कामांचे आश्‍वासन द्यायचे, असे प्रश्न सर्वच ग्रामपंचायतीमधील निवडणूक लढणाऱ्या पॅनेलप्रमुखांना पडले आहेत.
सरपंचपदासाठी सर्वच उमेदवार इच्छुक असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत पॅनेलप्रमुखांची डोकेदुखी वाढत जाणार असल्याने, थेट सरपंचपदाची निवडणूक पॅनेल पद्धतीने लढणाऱ्या पॅनेलप्रमुख, राजकीय पक्ष व संघटना यांना अडचणींची ठरत असल्याने निवडणूक लढविणारे पॅनेलप्रमुख हतबल झाले आहेत; तर ग्राप सदस्यपदाकरिता उमेदवार नकार देत असल्याने काही जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत सरपंचपदासाठी ७ वी पासची अट आहे. सरपंचपदाची निवड झाल्यावर दोन वर्षांपर्यंत व ग्रामपंचायतीची मुदत संपण्याच्या सहा महिने अगोदर कुठलाही अविश्वास ठराव आणता येणार नाही. दोन वर्षांनंतर काही कारणास्तव सरपंचपदावर अविश्वास ठराव आला व अविश्वास ठराव बारगळल्यास पुन्हा त्या सरपंचावर अविश्वास ठराव आणता येणार नाही.
सरपंचपदासाठी अपक्ष उमेदवारही निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांना पॅनेलविरहित पर्याय उपलब्ध होणार असल्याने सरपंचपदाची लॉटरी कोणालाही लागण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढवली जात नसल्याने सर्वच राजकीय पक्षांची गोची झाली असून, पॅनेलमधून निवडून येणारा सरपंच कधीही पॅनेल बदलू शकत असल्याने सर्वांचीच अडचण झाली आहे.

कोट
जनतेतून थेट निवडून येणाऱ्या सरपंचाला, सदस्यांना विचारात न घेता कोणतेही काम करण्याचा अधिकार मिळणार असल्याने ग्रामपंचायत सदस्यांचे सरपंचावर नियंत्रण राहणार नाही. त्यात निवडणूक लढविण्यासाठी सर्वच अनुसूचित जमातीचे उमेदवार सरपंचपदाची उमेदवारी मागत असल्याने अडचण होत आहे.
- दिलीप अधिकारी, ग्रामसन्मान पॅनेल, खर्डी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97851 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..