उत्तनच्या मच्छीमारांची ऑनलाईन फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तनच्या मच्छीमारांची ऑनलाईन फसवणूक
उत्तनच्या मच्छीमारांची ऑनलाईन फसवणूक

उत्तनच्या मच्छीमारांची ऑनलाईन फसवणूक

sakal_logo
By

भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : मासेमारीसाठी लागणारे साहित्य कमी किमतीत देण्याचे प्रलोभन दाखवून उत्तनमधील मच्छीमारांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मच्छीमारांनी उत्तन सागरी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
उत्तनमधील अनेक मच्छीमारांना मोबाईलवर फोन करून मासेमारीसाठी लागणारे साहित्य स्वस्तात देतो; मात्र त्यासाठी लागणारी रक्कम ऑनलाईन भरा, असे सांगण्यात आले. या वेळी समोरच्या व्यक्तीकडून व्हॉट्सॲपवर सामानाचे फोटो पाठवण्यात आले होते. तसेच उत्तनमधील इतर काही मच्छीमारांची नावेदेखील सांगण्यात आली. त्यामुळे मच्छीमारांचा विश्वास बसल्याने त्यांनी सांगितलेले पैसे ऑनलाईन जमा केले; मात्र त्यानंतर फोन करणारी व्यक्ती फोन बंद करून बेपत्ता झाली आहे.
उत्तन येथील मच्छीमार जस्टीन घोसाल यांना १७ सप्टेंबरला त्यांच्या मोबाईलवर फोन आला व त्यांना मासेमारीसाठी लागणारे दोरखंड, लोखंडी पाईप, प्लास्टिकचे क्रेट, जीपीएस वायरलेस यंत्रे अत्यंत स्वस्तात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. आगाऊ ६० हजार रुपये खात्यात ऑनलाईन जमा केले, तर हे सामान घरपोच देण्यात येईल, असेही त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे घोसाल यांनी सांगितलेल्या खात्यावर ५० हजार रुपये हस्तांतरित केले. दुसऱ्‍या दिवशी सकाळीच घोसाल यांना पुन्हा फोन आला व तुमच्या सामानाची गाडी काशी मिरा येथे पोहोचली आहे; मात्र आणखी ५० हजार रुपये खात्यात भरा, असे सांगण्यात आले. त्यामुळे घोसाल यांनी आणखी ५० हजार असे एकंदर एक लाख रुपये ऑनलाईन जमा केले. त्यानंतर गोसाल आपल्या मित्रासह काशी-मिरा येथे पोहोचले. मात्र गाडी न दिसल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्यात आल्याचे दिसून आले. याच पद्धतीने रॉकी गुपसुल यांनाही लोखंडी पाईप स्वस्तात देतो, असे सांगून त्यांच्याकडून २ लाख ७० हजार रुपये उकळण्यात आले आहेत. गुपसुल सामान आणण्यासाठी घोडबंदर येथील फाऊंटन हॉटेल येथे गेले. त्या ठिकाणी सात ते आठ व्यक्ती त्यांना भेटल्या. त्यांना लोखंडी पाईप असलेला ट्रकही दाखवण्यात आला. त्यामुळे गुपसुल घरी येऊन गाडीची वाट पाहात राहिले; मात्र गाडी आलीच नाही. याप्रकरणी घोसाल व गुपसुल यांनी उत्तन सागरी पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

प्रलोभनाला बळी पडू नये
उत्तनमधील आणखी काही मच्छीमारांना याच पद्धतीने मोबाईलवर फोन येत आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन मच्छीमारांचे नेते बर्नड डिमेलो यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97869 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..