पाऊस, ढगाळ वातावरण सोनचाफा उत्पादनाला फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस, ढगाळ वातावरण सोनचाफा उत्पादनाला फटका
पाऊस, ढगाळ वातावरण सोनचाफा उत्पादनाला फटका

पाऊस, ढगाळ वातावरण सोनचाफा उत्पादनाला फटका

sakal_logo
By

वसई, ता. २१ (बातमीदार) : वसईत मोठ्या प्रमाणात सोनचाफ्याची लागवड केली जाते. यातून बागायतदारांना चांगले उत्पन्न मिळते, मात्र गेल्या तीस वर्षांत प्रथमच चाफ्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. याची कारणे शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी भेट दिल्यावर जास्त पाऊस, ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदा लाखो रुपयांच्या उलाढालीवर पाणी सोडावे लागले आहे.
आगाशी, कोफराड, अर्नाळासह आजूबाजूच्या परिसरात सोनचाफ्याची लागवड केली जाते. सणासुदीच्या काळात, तसेच विविध शुभप्रसंगी या फुलांना चांगली मागणी असते. मुंबई, ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात ही फुले विक्रीसाठी पाठवली जातात; परंतु यंदा फुलांचे प्रमाण नगण्य आहे. कारण ज्या चाफ्याच्या झाडांना ५ हजार ते ८ हजार फुले येत होती, तिथे केवळ २०० फुले येत आहेत. गणेशोत्सव काळातदेखील फुले दिसेनाशी झाली होती. त्यामुळे अर्नाळा शेतकरी कार्यकारी सहकारी सोसायटीने कृषी विभागाला पत्र लिहून शास्त्रज्ञांना बोलावून संशोधन करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी (ता. २१) पालघर कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गबाले, अर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किरण पाटील, कृषी सहाय्यक अधिकारी, कृषी विभागाचे अन्य अधिकारी यांनी विरार, आगाशी, अर्नाळासह अन्य भागांत शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.
सततच्या पावसामुळे नवीन पालवी फुटत नाही, तसेच आर्द्रतेमुळे फुलांची संख्या कमी होत असते. सोनचाफ्याच्या झाडांना सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात लागतो; परंतु जून महिन्यापासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश केवळ ३ तासच मिळत आहे. त्यातच बुरशी येत असल्यास फुलांच्या संख्येवर परिणाम होत असल्याचे बागायतदारांना शास्त्रज्ञांनी सांगितले. त्याचबरोबर चाफ्याची लागवड केल्यावर कोणते उपाय केले पाहिजेत जेणेकरून उत्पादन वाढेल, याची माहिती कृषी विभागाने बागायतदारांना दिली.
---------------
वसई तालुक्यात अधिक पाऊस, ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाशाची कमतरता याचा परिणाम झाल्याने फुले कमी येत आहेत. शेतकऱ्यांनी छाटणी, फूलधारणा कशी येईल तसेच कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती प्रत्यक्ष भेटून देण्यात आली आहे.
- डॉ. एल. के. गबाले, पालघर कृषी संशोधन केंद्र
----------------
कृषी विभागाने चाफ्यात होणारी घट पाहून संशोधन करून बागायतदारांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसन पालघर कृषी संशोधन केंद्राकडून करण्यात आले.
- किरण पाटील, अध्यक्ष, अर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी
----------------
उपाययोजना कोणत्या असाव्यात
झाडांचा आकार छत्रीसारखा ठेवावा
वर्षभरात ४ वेळा खतांचा वापर करावा
बुरशीनाशक फवारणी करावी
झाडांची संखीय वाढ कमी असावी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97873 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..