किन्नर समुदायाचा स्वच्छतेला हातभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किन्नर समुदायाचा स्वच्छतेला हातभार
किन्नर समुदायाचा स्वच्छतेला हातभार

किन्नर समुदायाचा स्वच्छतेला हातभार

sakal_logo
By

घणसोली, ता. २२ (बातमीदार) : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नवी मुंबई महापालिकेनेही स्वच्छता मोहीम जोरात सुरू केली आहे. त्याचाच एक भाग गुरुवारी (ता. २२) नवी मुंबईतील मिनी सी-शोअर येथे पाहायला मिळाला. या ठिकाणी पालिकेने अभिनव संकल्पना राबवत स्वच्छता अमृत महोत्सवाला चक्क २०० हून अधिक तृतीयपंथी समुदायाने हातभार लावला आहे. या माध्यमातून पालिकेने स्वच्छतेचा जागर सुरू ठेवून आगळेवेगळे उदाहरण दिले आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ''इंडियन स्वच्छता लीग'' हा स्वच्छताविषयक देशव्यापी उपक्रम राबवण्यात येत आहे. त्‍या अनुषंगाने नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी व्यापक लोकसहभागातून अभिनव उपक्रम राबवले जात आहे. याची सुरुवात गुरुवारपासून झाली आहे. सर्वप्रथम वाशी येथील मिनी सी शोअर येथे तृतीयपंथींकडून परिसर स्वच्छतेचा कार्य्रक्रम राबवण्यात आला. या वेळी खाडीकिनारी असलेला कचरा त्यांच्याकडून वेचण्यात आला. या उपक्रमात २०० हून अधिक तृतीयपंथी सहभागी झाले होते. नागरिकांनी कचऱ्यासंदर्भात जागृत व्हावे, ओला-सुका आणि घरगुती कचरा यासंदर्भात वर्गीकरण करावे आणि महापालिकेच्या नियमांचे पालन करावे. यासाठी हिरवा, निळा आणि काळा या तीन रंगाच्या माध्यमातून कचरा वर्गीकरणाचा संदेश देण्यात आला. त्याचबरोअबर महापालिकेच्या वतीने झेंडा आणि बॅचदेखील देण्यात आले होते.
काही तृतीयपंथींनी ओल्या कचऱ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी निळा, सुका कचऱ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी हिरवा आणि घरगुती कचरा (मिक्स) यासाठी काळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. यात किन्नर माँ सामाजिक संस्था आणि लेट्स फिटनेस सामाजिक संस्था यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी परिसरात प्रभातफेरी काढून घोषणांद्वारे नागरिकांना जागृत करण्यात आले. एक वर्षापासून तृतीयपंथी समुदायाला रिचा समिथ (लीडर लेट्स सेलीब्रेट फिटनेस) या तृतीयपंथी समुदायाला कचरा वर्गीकरणाबद्दल माहिती देत आहेत. या वेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर ढोले, उपायुक्त सोमनाथ पोटरे, विभाग अधिकारी दत्तात्रय घनवट, वाशीचे स्वच्छता अधिकारी सुधीर पोटफोडे, विष्णुदास भावे नाट्यगृह व्यवस्थापक गिरीश चावरे, रीचा समिथ प्रमुख लेट्स सेलेब्रेट फिटनेस, किन्नर माँ सामाजिक संस्थेच्या प्रमुख राधा यामनिमि, स्वच्छता, अग्निशामक, पालिका कर्मचारी सहभागी होते.


नवी मुंबई महापालिकेच्या वतीने तृतीयपंथी समुदायाच्या सहभागातून हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नागरिकांचे लक्ष वेधून कचऱ्याबाबत जनजागृती करण्यासाठी तृतीयपंथींनी सहभाग घेतला होता. प्रत्येक समूहाने इंडियन स्वच्छता लीग यात सहभाग घ्यावा.
- सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका

तृतीयपंथींना याबाबत माहिती मिळावी. त्‍यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी त्‍यांची निवड करण्यात आली आहे
- रीचा समिथ, प्रमुख, लेट्स सेलेब्रेट फिटनेस

स्वच्छ अमृत महोत्सव या कार्यक्रमातून आम्हाला एक वेगळा मान मिळाला आहे. गाडीची काच खाली करून मिळालेला मान हा वेगळा असतो. मात्र, महापालिकेच्या उपक्रमात सहभाग घेऊन मिळालेला मानामुळे डोळे भरून आले.
- राधा यामनिमी, किन्नर माँ सामाजिक संस्था प्रमुख

आम्ही या कामाच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छतेसाठी सहभाग घेत आहोत. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आम्ही देखील ओला, सुका याचे वर्गीकरण करून नागरिकांना आवाहन करत आहोत.
- शोबना, तृतीयपंथी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97949 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..