गावाकडे हवीशी वाटणारी मांजर शहरात नकोशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावाकडे हवीशी वाटणारी मांजर शहरात नकोशी
गावाकडे हवीशी वाटणारी मांजर शहरात नकोशी

गावाकडे हवीशी वाटणारी मांजर शहरात नकोशी

sakal_logo
By

गावाकडे हवीशी वाटणारी मांजर शहरात नकोशी!

किंवा

गावची लाडकी मांजर शहरात नकोशी!

सुजित गायकवाड, नवी मुंबई

शहरीकरणाच्या नियोजनात जैविक साखळीतील महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्याचा सरकारी यंत्रणांना पडलेला विसर आता समस्या बनली आहे. नियोजनाअभावी विकासात्मक शहरांमध्ये मांजरीसारख्या शांत प्राण्यांचा उपद्रव होऊ लागला आहे. याआधी गावाकडे हवेहवेसे वाटणारे असे मुकी प्राणी आता शहरात मात्र नकोसे झाले आहेत. म्हणूनच मांजरींच्या निर्बीजीकरणाचा मुद्दा आता पुढे आला आहे...

मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, नवी मुंबई, पनवेल इत्यादी मुंबई महानगर प्रदेशात मोडणारी मोठी नगरे विकसित होत आहेत. कधी काळी इथेही गावे होती. वाढती लोकसंख्या आणि विकासाच्या ध्यासातून आता त्यांचे शहरात रूपांतर झाले आहे. मुंबई तर इंग्रज काळापासून शहर होते. तरीसुद्धा तिथे भटक्या प्राण्यांचे नियोजन स्थानिक प्राधिकरणाला म्हणावे तसे करता आलेले नाही. प्रत्येक महापालिका आणि नगर परिषदांना श्वानांच्या धर्तीवर आता मांजरांचेही निर्बीजीकरण केंद्र उभारावे लागणार आहे. शहरात आता माजरांचे आश्रयस्थान असलेल्या कौलारू आणि कुडाच्या भिंतींची घरांच्या जागी गगनाला भिडणारी काँक्रीटची जंगले उभी राहिली. बागडण्यासाठी हक्काची जागा असणारे गावठाण, गुरचरण, गावाबाहेरची शेती आणि झाडा-झुडपांच्या जागांवर भव्य मोकळी मैदाने, उद्याने, स्पोर्टस् क्लब, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कारखाने, मॉल आदी भौतिक सुखे आली आहेत. त्यामुळे आता मांजरे इमारतीमध्ये वास्तव्य करू लागली. टोलेजंग इमारतींमधील जिन्याखाली, मीटर रूमच्या आवारात, सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये तर कधी पाण्याच्या पंप हाऊसमध्ये मांजरे वावरू लागली. सार्वजनिक ठिकाणी त्यांचा मुक्त संचार होऊ लागला. इथपर्यंत सर्व ठीक होते; परंतु त्यांच्याकडून भूक भागवण्यासाठी कचरा-कुंड्या उपसणे, घराबाहेर ठेवलेल्या डस्टबिन्समधील अन्नपदार्थ शोधण्यासाठी कचरा अस्ताव्यस्त करणे इत्यादी उपद्रव वारंवार होऊ लागल्याने रहिवाशांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. बऱ्याचदा मांजरे वाहनांखाली झोपत असल्यामुळे त्यांचे अपघात होऊ लागले. असे अपघात आजही अपशकुन मानले जातात. माजरींनी पिल्ले घातली की मग सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या लहान मुलांना त्यांच्यापासूनचा धोका आणखी बळावतो. अशा परिस्थितीत मांजरीने अंगावर हल्ला करणे, नखे मारणे आदींसारख्या घटना शहरात घडल्या आहेत. त्यामुळे घराजवळच्या उकिरड्यावरील घाण साफ करणारी आणि साप-विंचूसारख्या विषारी शत्रूंपासून संरक्षण करणारी मांजरे शहरवासीयांना नकोशी झाली आहेत.

श्वानाप्रमाणेच आता मांजरी पकडणार
मुंबई महापालिकेकडे याआधीपासून मांजरीच्या उपद्रवाच्या अनेक तक्रारी रहिवाशांकडून आल्या आहेत. तेव्हा मांजर पकडण्याची यंत्रणा पालिकेकडे नव्हती. वाढत्या तक्रारींमुळे आता पालिकेनेही प्रशिक्षित संस्थांच्या मदतीने मांजरींना पकडून त्यांच्या निर्बीजीकरणाचे प्रयत्न सुरू केले आहेत; परंतु त्याला फारसे यश आलेले नाही. आता नवी मुंबईसारख्या नियोजनबद्ध शहरातही मांजरांच्या उपद्रवाच्या तक्रारी महापालिकेकडे येऊ लागल्या आहेत. सीवूड्स सेक्टर ४२ मधील ‘श्रीजी हाईट्स’सारख्या उच्चभ्रू वस्तीमधील रहिवाशांनी तर भटक्या मांजरांचा बंदोबस्त करण्याचे साकडेच महापालिकेला घातले आहे. मात्र, इतर महापालिकांप्रमाणेच नवी मुंबईकडेही मांजर पकडण्याची तशी व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने विभाग कार्यालय स्तरावर मांजरांच्या तक्रारींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. श्वान पकडणाऱ्या संस्थेवरच मांजरांचा बंदोबस्त करण्याच्या कामाची जबाबदारी दिली आहे... पण मांजरांची समस्या एवढ्यावरच थांबणार आहे का?

मांजराशी निगडित प्रथा आजही प्रचलित
पुरातन काळात मांजराला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. मानवी जीवनात मांजरीला घेऊन वेगवेगळ्या चालीरीती आणि परंपरा आहेत. एखाद्या चांगल्या कामाला जाताना मांजर आडवे गेल्यास सात पावले मागे जाण्याची अथवा त्या रस्त्याने न जाता वेगळ्या आडमार्गे इच्छित स्थळी जाण्याची प्रथा गावाकडे रूढ आहे. शहरातही अशी प्रथा काही जण मानतात; परंतु गावाकडे मानवी आयुष्यात त्यापलीकडेही मांजराला स्थान असते. मांजराचे आवडते खाद्य उंदीर असल्यामुळे प्रत्येक घरोघरी एक-दोन मांजर हमखास पाळल्या जातात. घरातील सर्वांचे जेवण झाले की मांजरीला जेवण दिले जाते. मांसाहारी जेवणावर मांजरांचे विशेष प्रेम. गावाकडे घरात साप-विंचवासारख्या विषारी प्राण्यांचा धोका अधिक असतो. त्या वेळेस मांजर एकमेव असा प्राणी आहे की जो आपल्याला अशा धोक्यांपासून रात्रभर दूर ठेवतो. घरासोबत शेतावरही उंदरांपासून होणारा त्रास दूर करण्यासाठी शेतकरी मांजरे पाळत. लहान मुले मांजरीसोबत खेळण्यात दिवस घालवतात. त्यामुळे इमानदार श्वानाइतकेच महत्त्व मांजरीलाही आहे.

मांजरांचा उपद्रव कसा थांबवणार?
१. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वात आधी मांजर पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. स्वभावाने शांत असलेली मांजर जेव्हा संकट परतवण्यासाठी रौद्ररूप धारण करते तेव्हा ती वाघाची मावशी असल्याचा प्रत्यय पकडणाऱ्यांना देते.
२. लहान आणि चपळ शरीर, वेगात झाडावर अथवा मिळेल त्या ठिकाणी चढणे, अडगळीच्या ठिकाणी सहज लपून बसणे, बेसावध असणाऱ्यावर अचानक उडी घेऊन त्याच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न करणे इत्यादी मांजरीची काही आक्रमक स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. साहजिकच अशा आक्रमकतेमुळे मुंबई महापालिकेचा मांजर पकडण्याचा प्रयत्न असफल ठरला. विशेष म्हणजे पालिकेला तशी संस्थाच मिळेनाशी झाली.
३. आता नवी मुंबई महापालिका मांजर पकडण्याचे धाडस करू पाहत आहे. २ कोटी २४ लाख रुपयांच्या श्वान पकडण्याच्या कंत्राटाच्या निविदेत महापालिकेने मांजरीच्या बंदोबस्ताच्या कामाचाही समावेश केला आहे. त्यासाठी महापालिकेने निर्बीजीकरण आणि लसीकरणाची व्यवस्था करण्याचे काम हाती घेतले आहे.
४. पाळीव आणि भटक्या मांजरांना झालेली इजा व आजारावर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे याआधी आठवड्याला ५० तक्रारी येत असत; परंतु आता उपचारासोबत उपद्रव होत असलेल्या तक्रारींचा सूर वाढू लागला आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त श्रीराम पवार यांनी दिली.

सरकारी अनास्था अन् उदासीनता
मुक्या जनावरांसाठी अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार आत्तापर्यंत देशभरात फक्त श्वानांसाठी निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. याच नियमांनुसार शहरातील भटक्या श्वानांची गणना होते. त्यांची वाढती संख्या आणि नियोजनानुसार तंत्रज्ञान अन् वैदिक उपचार केले जातात; परंतु आतापर्यंत भटक्या मांजरींवर असे नियंत्रण कधीच आणले गेले नव्हते. त्यामुळे राज्यातील कोणत्याही विकसित शहरात मांजरांच्या एकूण संख्येचा अंदाज सरकारी यंत्रणांना नाही. त्यांच्यासाठी कधी निर्बीजीकरण केंद्रही उभारण्यात आलेले नाही. फक्त घरातील पाळीव आणि विविध प्रजातींच्या महागड्या मांजरींवर खासगी डॉक्टरांकडे उपचार होत आहेत.

काय करायला हवे?
श्वानांप्रमाणेच मांजरांसाठीही निर्बीजीकरण केंद्रांची गरज आहे. श्वानांचा मानसिक अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांच्यावरील उपचार पद्धती निश्चित केली गेली आहे. त्याच धर्तीवर मांजरांची मानसिकता तपासून त्याच्या आधारे उपचार पद्धती निश्चित करायला हव्यात. मांजरांची शहरातील संख्या आणि मानवी वस्त्यांमध्ये होणाऱ्या हल्ल्यांचा विचार करून वेळीच उपाय-योजना करण्याची गरज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97969 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..