‘त्या’ सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार वारसा हक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्या’ सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार वारसा हक्क
‘त्या’ सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार वारसा हक्क

‘त्या’ सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार वारसा हक्क

sakal_logo
By

भाईंदर, ता. २२ (बातमीदार): मिरा-भाईंदर महापालिकेतील ५३८ सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करण्यासंदर्भात उपसमिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे निर्णयासाठी प्रलंबित होता. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळाने या विषयावर उपसमिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
तत्कालीन मिरा-भाईंदर नगर परिषदेत ५३८ सफाई कर्मचाऱ्यांना १९९० च्या आसपास कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना २००० मधील शासन निर्णयानुसार सेवेत कायम करण्यात आले; पण या कर्मचाऱ्यांची सेवा १९९३ पासून न धरता ती २००० पासून ग्राह्य धरण्याचे, तसेच त्यांना वारसा हक्क लागू होणार नाही व त्यांच्या निवृत्तीनंतर ही पदे रद्द होतील, असे शासन निर्णयात नमूद होते. त्यामुळे हा अन्याय दूर करण्यासाठी २००५ मध्ये आधी स्थायी समितीने व २००६ मध्ये महासभेने या कर्मचाऱ्यांची सेवा १९९३ पासून ग्राह्य धरून त्यानुसार सेवाज्येष्ठता देण्यास, तसेच त्यांना वारसा हक्क देण्यास मान्यता दिली.
या कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करण्याचा अधिकार राज्य सरकारचा असल्यामुळे प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक होती. त्यामुळे तत्कालीन आयुक्तांनी प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवला होता. मात्र या प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नव्हता.
महापालिकेतील अन्य सफाई कर्माचारी सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना नोकरी मिळत आहे; परंतु राज्य सरकारच्या अटीनुसार ५३८ कर्मचारी या लाभापासून वंचित आहेत. श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या विषयावर भेट घेतली व सफाई कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची विनंती केली. या मागणीनुसार मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एक उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपसमितीकडे महापालिकेने फेर प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यावर तात्काळ निर्णय होणार आहे, अशी माहिती श्रमजीवीचे सुलतान पटेल यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98000 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..