बचत गटांना कोट्यवधींचे कर्ज वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटांना कोट्यवधींचे कर्ज वाटप
बचत गटांना कोट्यवधींचे कर्ज वाटप

बचत गटांना कोट्यवधींचे कर्ज वाटप

sakal_logo
By

रोहा, ता. २५ (बातमीदार) ः
महिलांचा सामाजिक व आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. रोहा नगर परिषद व संसाधन संस्था महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बचत गटांची स्थापना करून वैयक्‍तिक तसेच सामुहिकरीत्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. जनतेचे राहणीमान उंचावणे व त्यांना रोजगाराची उपलब्धता करून देणे हा योजनेचा उद्देश आहे. रोहा नगरपरिषद क्षेत्रात पाच वर्षात एकूण १४३ स्वयंसहायता बचत गटांची स्थापना केली असून प्रत्येक गटाला १० हजार रुपये फिरता निधी उपलब्ध करून दिला आहे.
रोहा नगर परिषद क्षेत्रात सहा नोंदणीकृत वस्तीस्तरीय संघाची स्थापना झाली असून प्रत्‍येकी अनुक्रमे २० ते २५ बचत गट कार्यरत आहेत. सहा वस्तीस्तर संघातून एक शहर स्तरीय संघ स्थापन करण्यात आला असून सर्व गटांना बॅंकींग सेवा उपलब्‍ध करून देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक शहरी गरिबांपर्यंत पोहचविण्याची उपाययोजना करण्यात येत आहे.
३० सप्टेंबर २०२२ रोजी एनयुएलएम १.० योजना संपुष्टात येत असून एनयुएलएम २.० ही योजना कार्यान्वित होत आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून रोहा नगर परिषद क्षेत्रात शहर स्तरीय संघाच्या अंतर्गत एक उपजीविका केंद्र स्थापन करण्यात येत आहे.

शहर उपजीविका केंद्र उभारणार
शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या गरजेनुरूप विविध सेवा पुरविणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, विविध उद्योग-व्यवसायांना मार्गदर्शन करणे, कौशल्य प्रशिक्षण आयोजित करणे, शासकीय योजनांची माहिती देणे, पतपुरवठ्यास मदत करणे इत्यादी उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. काही ठराविक सेवांवर सेवाशुल्क आकारून शहर उपजीविका केंद्र स्वबळावर उभे करणार असल्‍याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

बॅंक लिंकेजच्या माध्यमातून बचत गटांना आतापर्यंत चार कोटी १२ लाख ६७ हजार रुपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. सर्व बचत गटाच्या मिळून एकूण १, ४६० महिलांना स्वयंरोजगार मिळाला असून त्‍या आत्मनिर्भर होत आहेत. बचत गट नियमित व मुदतीत कर्जफेड करीत आहेत.
- डॉ. धीरज चव्हाण, मुख्याधिकारी