Mumbai : रस्‍तारोकोनंतर सिडकोला जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MUMBAI
रस्‍तारोकोनंतर सिडकोला जाग

Mumbai : रस्‍तारोकोनंतर सिडकोला जाग

पनवेल : खड्ड्यांमुळे नवीन पनवेल येथील उड्डाणपुलावर होणाऱ्या दैनंदिन ‌वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्‍त आहेत. याविरोधात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्‍वाखाली गुरुवारी रास्‍ता रोको आंदोलन करताच सिडको प्रशासनाला जाग आली. रविवारपर्यंत पुलावरील सर्व खड्डे बुजवणार तसेच रस्त्याच्या चारी बाजूच्या सिमेंट कॉँक्रिटीकरणाची निविदा आठवडाभरात काढण्याचे आश्वासन सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी दिल्‍यावर आंदोलन मागे घेण्यात आले. तब्‍बल दीड तास आंदोलन करण्यात आल्‍याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

नवीन पनवेल-माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या पुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडली गेली असून दळणवळणासाठी हा प्रमुख मार्ग आहे. खड्ड्यांमुळे पुलाची अक्षरशः चाळण झाली असून दररोज अपघात होऊन अनेकजण जखमी होत आहेत. तर काहींना कायमचे जायबंदी व्हावे लागत आहे.

पुलावरील रहदारीचा विचार करता, उतारावर दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटीकरण होणे गरजेचे असताना सिडकोकडून कायम दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांच्या समस्‍यांना वाचा फोडण्यासाठी सत्ताधरी पक्षातील आमदार प्रशांत ठाकूर यांना चक्‍क सिडकोविरोधात आंदोलन करावे लागते. भर पावसात दीड तास पुलावर रास्‍ता रोको केल्‍याने सुकापूर, आदई सर्कलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्‍या होत्‍या.

माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अॅड. मनोज भुजबळ, संतोष शेट्टी, तेजस कांडपिळे, नितीन पाटील, अजय बहिरा, माजी महापौर चारुशीला घरत, सुशीला घरत, वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, हरीश मोकल आदींसह नवीन पनवेल, खांदा कॉलनीतील अनेक सोसायट्यांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

आंदोलकांनी रस्ता अडवल्यावर सिडकोच्या बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंत्‍यांनी दोन महिन्यात निविदा काढतो, आंदोलन मागे घ्‍या, असे सांगितले मात्र त्‍यात आमदार ठाकूर यांनी नकात देत भर पावसात रस्त्यावर ठाण मांडले. त्‍यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. यात स्‍कूलबसही अडकल्‍या. अखेर वाहतूक पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मध्यस्थीनंतर काही वेळ वाहतूक सुरू करण्यात आली.

सिडको अधिकाऱ्यांनी दिलेल्‍या आश्‍वासनानुसार रविवारपर्यंत खड्डे न भरल्यास सोमवारी पुन्हा आंदोलन करू. वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत आहे. अद्याप हा रस्‍ता महापालिकेकडे हस्‍तांतर झालेला नाही. अशीच समस्या खांदा कॉलनी व पोदीच्या भुयारी मार्गाची आहे. यापुढेही कार्यवाही न झाल्‍यास तीव्र आंदोलन करणार आहोत.
- प्रशांत ठाकूर, आमदार

नवीन पनवेलला जोडणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होतात, अनेक जण जखमी होतात. शिवाय वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला उतारावर चौक असल्यास सिमेंट काँक्रिटीकरण होणे अपेक्षित आहे. दर वर्षी पावसाळ्यात तात्पुरती दुरुस्ती केली जाते. मात्र पुन्हा स्‍थिती जैसे थे होते. गतवर्षी मी स्‍वतः डांबर टाकून खड्डे भरले होते. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्‍याने आंदोलन करावे लागले.
- परेश ठाकूर, माजी सभागृह नेते, पनवेल

नवीन पनवेलला जोडणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूला दरवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. यासाठी नवी मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक चौकात सिमेंट काँक्रिटीकरणाची मागणी दोन वर्षांपासून करीत आहोत. पण सिडकोकडून दुर्लक्ष होत आहे.
- संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98011 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..