मुंबईत कुष्ठरोगाने पुन्हा डोके वर काढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कुष्ठरोगाने पुन्हा डोके वर काढले
मुंबईत कुष्ठरोगाने पुन्हा डोके वर काढले

मुंबईत कुष्ठरोगाने पुन्हा डोके वर काढले

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः मुंबईत समूळ उच्चाटन झालेल्या कुष्ठरोगाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महापालिकेने सातत्याने राबवलेल्या विशेष कुष्ठरुग्ण शोध मोहिमेत सर्वाधिक सांसर्गिक कुष्ठरुग्ण सापडले आहेत. ५ वर्षांत मुंबईत १२०० हून अधिक नव्या कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेने आताही कुष्ठरोग तसेच क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे.
कोविड काळात कुष्ठरुग्णांची नोंद कमी झाली होती. मात्र, त्यानंतर रुग्ण वाढले असून २०२०-२१ या कालावधीदरम्यान कुष्ठरुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट नोंदली गेली होती. या काळात १६६ रुग्णांची नोंद झाली होती. पण, ही संख्या पुन्हा वाढल्याने आता २०२१-२२ एकूण ३३५ आणि २०२२ च्या ऑगस्टपर्यंत तब्बल २३६ रुग्ण सापडले आहेत. या आकडेवारीनुसार, कुष्ठरुग्ण वाढत असल्याची नोंद होत आहे.

कुष्ठरोग म्हणजे काय ः
कुष्ठरोग हा कुष्ठजंतूमुळे होणारा हवेमार्फत पसरणारा त्वचा व नसा यांचा एक सर्वसाधारण आजार आहे.

कुष्ठरोगाचे प्रकार ः
सांसर्गिक कुष्ठरोग (मल्टि बॅसिलॅरी लेप्रसी)
असांसर्गिक कुष्ठरोग (पॉसि बॅसिलॅरी लेप्रसी)

कुष्ठरोगाची लक्षणे ः
त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा/चट्टे त्या ठिकाणी घाम न येणे, जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे तसेच तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा व जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.

कुष्ठरोगावरील औषधोपचार ः
बहुविध औषधो उपचार पद्धती हे कुष्ठरोगावरील प्रभावी औषध आहे. हे औषध सर्व सरकारी व महानगरपालिकेची रुग्णालये व दवाखाने येथे मोफत उपलब्ध आहे. कुष्ठरोगाचे लवकर निदान करून औषधोपचार सुरू केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो; तसेच होणारी शारीरिक विकृती टाळता येते. बहुविध औषधोपचार पद्धती अंतर्गत असांसर्गिक रुग्णांना सहा महिने, तर सांसर्गिक रुग्णांना बारा महिने एवढ्या कालावधीसाठी उपचार घ्यावे लागतात. औषधोपचार महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने व आरोग्य केंद्रांमध्ये, तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहेत.

मुंबईतील मागील ५ वर्षांची नवीन कुष्ठरुग्णांची संख्या
वर्ष सांसर्गिक कुष्ठरुग्ण असांसर्गिक कुष्ठरुग्ण एकूण
२०१७-१८ २७१ १६१ ४३२
२०१८-१९ ३१२ १६२ ४७४
२०१९-२० २९९ १६७ ४६६
२०२०-२१ १२३ ४३ १६६
२०२१-२२ २५३ ८२ ३३५
एप्रिल२०२२ ते ऑगस्ट २०२२ १८७ ४९ २३६
...................................................

संयुक्त सक्रिय क्षयरोग शोध मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान २०२२
मोहीम कालावधी ः २६ सप्टेंबर २०२२ ते १२ ऑक्टोबर २०२२
मोहिमेत तपासणी करण्यात येणारी लोकसंख्या ः ४९३४५१३ (एकोणपन्नास लाख चौतीस हजार पाचशे तेरा)
मोहिमेत भेटी देण्यात येणाऱ्या घरांची संख्या ः ९६९९०२ (नऊ लाख एकाणसत्तर हजार नवशे दोन)
.........................................................
५ वर्षांत राबवण्यात आलेल्या विशेष कुष्ठरोग मोहिमा ः

वर्ष विशेष कुष्ठरोग मोहीम सांसर्गिक कुष्ठरुग्ण असांसर्गिक कुष्ठरुग्ण एकूण
२०१८-१९ कुष्ठरोग शोध मोहीम २८ २४ ५२
२०१९-२० संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग मोहीम ३२ १९ ५१
२०२०-२१ संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग मोहीम ११ ०६ १७
सक्रिय कुष्ठरोग शोध मोहीम व
नियमित संनियंत्रण १३ ०७ २०
२०२१-२२ सक्रिय कुष्ठरोग शोध मोहीम व
नियमित संनियंत्रण ३५ १७ ५२

पूर्णपणे बरा होणारा आजार -
कुष्ठरुग्णास वेळेत योग्य ते औषधोपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. यासाठी कुष्ठरोगबाधित झालेल्या व्यक्तींची वेळेत तपासणी होऊन औषधोपचार वेळच्या वेळी होऊन ते लवकरात लवकर बरे होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन विविध स्तरावर मोहिमा राबवल्या जातात. आता ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम’ राबवून कुष्ठरोग व कुष्ठबाधित व्यक्तींनाही समाजात मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.