पुनर्विकासात भरडताहेत मराठी कुटुंबे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनर्विकासात भरडताहेत मराठी कुटुंबे
पुनर्विकासात भरडताहेत मराठी कुटुंबे

पुनर्विकासात भरडताहेत मराठी कुटुंबे

sakal_logo
By

पुनर्विकासात भरडताहेत मराठी कुटुंबे
विकसकाने भाडे थकवल्याने पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची नामुष्की

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : काळाचौकीतील रंगारी बदक चाळ मराठी माणसांची वसाहत म्हणून ओळखली जाते. चाळीचा पुनर्विकास सध्या गोल्ड प्लाझा विकसकाने हाती घेतला आहे; परंतु गेल्या काही वर्षांपासून त्याने रहिवाशांचे पर्यायी वास्तव्याचे भाडे थकवल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. तीन वर्षांपासून भाडे मिळत नसल्याने प्रकल्पातील कुटुंबांवर घरांचे भाडे भरण्यासाठी पत्नीचे दागिने आणि मंगळसूत्र गहाण ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. घराचा ताबा मिळत नसल्याने आणि विकसक भाडे देत नसल्याने हातावर पोट असलेली कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. घराचे भाडे परवडत नसल्याने मराठी कुटुंबांना मुंबईबाहेरचा रस्ता धरावा लागला आहे.

रंगारी क्रमांक १, २ आणि ३ चाळींचा पुनर्विकास गोल्ड प्लाझा विकसकाने २०१५ पासून हाती घेतला आहे. रहिवाशांना त्याने तेव्हापासून भाडे देण्यास सुरुवात केली. मात्र, २०१७ पासून विकसकाकडून भाडे देण्यात दिरंगाई होऊ लागल्याचा आरोप विकसकांनी केला आहे. चाळीमधील बहुतांश रहिवासी मराठी असून त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. दरमहा १० ते १५ हजारांची नोकरी आणि त्यातच घराचा अन् मुलांच्या शिक्षणाचा खर्च करावा लागत आहे. हातावर पोट असलेल्या कुटुंबांतील अनेकांना कोरोना काळात रोजगार गमवावा लागला. परिणामी घराचे भाडे द्यायचे की जगायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. भाड्यासाठी रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, म्हाडा आणि महापालिका कार्यालय व स्थानिक पोलिस ठाण्यात दाद मागितली. मात्र, विकसक तुटपुंजे भाडे देऊन बोळवण करत आहे. १८१ भाडेकरूंचे सुमारे १४ ते १५ कोटी रुपये भाडे थकित आहे, असा आरोप अनेक रहिवासी करत आहेत. भाड्यासाठी रहिवासी विकसकाच्या कार्यालयात चकरा मारत आहेत.

कर्ज काढून घरभाडे
विकसकाने तीन वर्षांपासून भाडे थकवले आहे. इमारतीच्या बांधकामाबद्दलही आम्हाला शंका आहे; परंतु त्याची माहिती विकसक देत नाही. घराचे भाडे १५ हजार रुपये आहे. कोरोना काळात नोकरी गेली. आता छोटासा व्यवसाय करतो. मुलांच्या शिक्षणावर मोठा खर्च होत आहे. त्यामुळे पत्नीचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे, अशी कैफियत रहिवासी दिनकर निंबाळकर यांनी मांडली.

पत्नीचे मंगळसूत्र गहाण
आम्ही तिघे भावंडे भाड्याने वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहोत. १२ ते १५ हजार रुपये घरभाडे द्यावे लागते. भाडे थकल्यास मालक घर रिकामे करण्यास सांगतात. तीन वर्षांपासून असा प्रकार सुरू आहे. भाडे मिळत नसल्याने कर्ज घेण्याची वेळ आली आहे. तिन्ही भावंडांनी घराचे भाडे भरण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे. विकसकाला दूरध्वनी केल्यास दाद मिळत नाही, असे रहिवासी भारत नीलेकर यांनी सांगितले.

...म्हणून मुंबई सोडावी लागली
तीन वर्षांत केवळ दीड लाख रुपये भाडे मिळाले. अजूनही सात लाखांहून अधिक रक्कम येणे बाकी आहे. यापूर्वी मुंबईत भाड्याने राहत होतो. भाडे मिळणे बंद झाल्याने ते देणे अशक्य झाले. त्यामुळे दागिने गहाण ठेवून घरभाडे दिले. कोरोना काळात पतीची नोकरी गेली. त्यांना अजूनही नोकरी मिळालेली नाही. मुंबईत भाडे अधिक असल्याने नाईलाजास्तव दिव्याला राहण्यास जावे लागले, असे रहिवासी तनुजा बने म्हणाल्या.

कोरोना साथीमुळे आर्थिक संकट आले. रहिवाशांना वेळेवर भाडे दिले जात येत होते; परंतु सध्या थोडी थोडी रक्कम देण्यात येत आहे, हे सत्य आहे. रहिवाशांचे सहा कोटी रुपये भाडे थकित आहे. त्यांना भाडे देण्यात येईल. इमारत तयार असून त्यामध्ये अंतर्गत कामे सुरू आहेत. ती कामे पूर्ण होताच रहिवाशांना घराचा ताबा देण्यात येईल.
- गिरीश जैन, विकसक, गोल्ड प्लाझा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98031 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..