राज्यातील २० जण ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील २० जण ताब्यात
राज्यातील २० जण ताब्यात

राज्यातील २० जण ताब्यात

sakal_logo
By

राज्यातील २० जण ताब्यात
‘पीएफआय’वर तपास यंत्रणांची कारवाई
मुंबई, ता. २२ : दहशतवादी कारवायांना निधी पुरवणे, मनी लॉण्डरिंग तसेच दहशतवादी घटनांच्या संबंधावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) महाराष्ट्रासह देशभरातील शंभरहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे २० जणांचा समावेश आहे. गुरुवारी पहाटेपासून राज्यातील विविध जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरात तपास यंत्रणांनी छापेमारी केली. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), सक्तवसुली संचलनालय (ईडी) तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तरित्या केलेली ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जाते.
एनआयएने मुंबईतील चिता कॅम्प येथील ‘पीएफआय’च्या कार्यालयावर गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास छापा टाकत अहमद अबीबुल्ला नामक व्यक्तीला ताब्यात घेतले. अहमद हा मंगळूर येथून मुंबईत आला होता. सकाळी अकरा वाजेपर्यंत एनआयएचे पथक तपास कतत होते. तसेच भिवंडीतील बंगालपुरा भागातही पहाटेच्या वेळी एनआयएने छापेमारी करत मैनुद्दीन मोमीन नामक व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याच्याकडील काही संशयास्पद वस्तूही जप्त करण्यात आल्या. तो कोणत्या कामात क्रियाशील होता, याचाही तपास एनआयए करत आहे. मोमीन हा बंगालपुरा येथे परिवारासह राहत होता. घराजवळील इमारतीत त्याचा चॉकलेट-बिस्किट विक्रीचा व्यवसाय होता. सध्या त्याच्या दुकानासह घराला कुलूप लावण्यात आले आहे.

नेरूळमधून दोघांवर कारवाई
दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या संशयावरून एनआयएने गुरुवारी पहाटे ‘पीएफआय’च्या नेरूळ येथील कार्यालयावर छापेमारी केली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर एनआयएने दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, पत्रके जप्त करण्यात आली. दरम्यान, कारवाईवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

नूपुर शर्माविरोधात आंदोलन करणारा अटकेत
राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी पहाटे पनवेलमधील असिफ अधिकारी या ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. असिफ अधिकारी हा पनवेलच्या बंदर रोड परिसरात राहत असून तो गत दोन वर्षांपासून पीएफआयसाठी काम करत होता. नुकतेच त्याने पनवेलमध्ये संघटनेच्यावतीने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्माविरोधात आंदोलन केले होते.

राज्यातही छापासत्र
देशभरात ‘पीएफआय’च्या कार्यालयांवर छापासत्र सुरू असताना महाराष्ट्रातही सुमारे १२ जिल्ह्यांमध्ये तपास पथकाने कारवाई केली. मुंबई, ठाणेसह औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव येथे छापे टाकण्यात आले. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे भादंवि १२०(ब), १२१ अ, १५३(अ) आणि यूएपीए १३(१)(ब) च्या विविध कलमान्वये बेकायदेशीर कृत्ये करणे, समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे आदी आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानुसार राज्यातील ‘पीएफआय’शी संबंधित सुमारे २० जणांना ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98070 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..