Heart attack: अचानक बंद पडणारे हृदय व प्राथमिक उपचारांसाठी जनजागृती सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heart attack:अचानक बंद पडणारे हृदय व प्राथमिक उपचारांसाठी जनजागृती सप्ताह
अचानक बंद पडणारे हृदय व प्राथमिक उपचारांसाठी जनजागृती सप्ताह

Heart attack:अचानक बंद पडणारे हृदय व प्राथमिक उपचारांसाठी जनजागृती सप्ताह

sakal_logo
By

मुंबई: देशभरात ‘अचानक हृदय बंद पडणे व त्यावरील प्राथमिक उपचार’ याबाबत दरवर्षी २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान जनजागृती सप्ताह पाळण्यात येतो. यानुसार विलेपार्ले (पश्चिम) या परिसरातील महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसवानजी कूपर सर्वोपचार रुग्णालय येथील बधिरीकरण शास्त्र विभागाद्वारे विविध स्तरीय जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली आहे.

मोहिते यांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक बंद पडणे, याला वैद्यकीय परिभाषेत ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ असे म्हणतात. ही एक धोकादायक स्थिती असून त्यावर त्वरित उपचार न केल्यास, त्या व्यक्तीचे प्राण वाचवणे खूप कठीण असते. अशा वेळेस त्या ठिकाणी जवळपास हजर असलेल्या कोणत्याही व्यक्तीने हृदय बंद पडलेल्या व्यक्तीच्या हृदयावर एका विशिष्ट पद्धतीने दाब दिल्यास त्यामुळे मेंदूचा व हृदयाचा रक्तपुरवठा सुरू राहण्यास मदत होते. या प्रक्रियेस वैद्यकीय परिभाषेत ‘कम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट’ असे म्हणतात.

हा उपचार वेळच्यावेळी दिल्यामुळे संबंधित व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. हृदय बंद पडल्यापासून रुग्णालयात नेईपर्यंतचा हा कालावधी रुग्णासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे याबाबत जनसामान्यांमध्ये जागरूकता वाढविणे व व्यापक जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. याच हेतूने दरवर्षी २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान एससीए जागरूकता सप्ताह पाळण्यात येत असतो.

देशभरात सर्वत्र तज्ज्ञ डॉक्टर हे या सप्ताहादरम्यान ‘सीओएलएस’चे प्रशिक्षण जास्तीत-जास्त लोकांना देतात. यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसवानजी कूपर सर्वोपचार रुग्णालय येथील बधिरीकरण शास्त्र विभागाच्या पुढाकाराने ‘एससीए’ जनजागृती सप्ताहादरम्यान रुग्णालयातील कर्मचारी आणि जवळच्या शाळा, महाविद्यालय व गर्दीच्या ठिकाणी ‘सीओएलएस’ चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.