मनोरसाठी राजकीय पक्षांनी लावला जोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनोरसाठी राजकीय पक्षांनी लावला जोर
मनोरसाठी राजकीय पक्षांनी लावला जोर

मनोरसाठी राजकीय पक्षांनी लावला जोर

sakal_logo
By

मनोर, ता. २५ (बातमीदार) : पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील मनोर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. युती, आघाडी होत नसल्याने सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहेत.
मनोर ग्रामपंचायत हद्दीत नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. पूर्व भागातील महत्त्वाची ग्रामपंचायत असल्याने मनोर ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी प्रमुख पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. येत्या १३ ऑक्टोबरला ग्रामपंचायतीच्या १७ सदस्य आणि थेट सरपंचपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. यंदा सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचीत जमातीसाठी (सर्वसाधारण) आरक्षित आहे.
ग्रामपंचायतीवर २०१६ पासून बहुजन विकास आघाडीप्रणीत परिवर्तन पॅनेलची सत्ता आहे. तसेच या भागात बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेची ताकद तुल्यबळ आहे. प्रशांत घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीने ताकदीने सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण आणि अनंता पुंजारा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सर्वच जागा लढवण्याच्या तयारीत आहे. माजी उपसरपंच साजिद खतीब यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतल्याने राष्ट्रवादी पक्ष पुनर्जीवित झाला असून सर्वच जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष आसिफ मेमन यांच्या नेतृत्वाखाली सरपंचासह अकरा जागा लढवणार आहे. मनसेचे विभागाध्यक्ष गणेश घोलप यांनी सरपंच पदाचा उमेदवार उतरवला आहे, तर भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस संतोष जनाठे यांनी सरपंचांसह १८ जागा लढवण्याची तयारी केली आहे.

अर्ज भरण्यासाठी गर्दी
सर्वच पक्षांची स्वबळावर लढण्याची तयारी आहे, पण अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव अंतिम टप्प्यात आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफे आणि केंद्रावर गर्दी केली जात आहे.


उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. समविचारी पक्षांकडून प्रस्ताव आल्यास एकत्र निवडणूक लढवण्याबाबत ठरवले जाईल.
- प्रशांत घोसाळकर, बहुजन विकास आघाडी

गावाच्या विकासासाठी समविचारी पक्षांसोबत एकत्र येण्याची तयारी आहे, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.
- वसंत चव्हाण, जिल्हाप्रमुख शिवसेना

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व पक्षांना युतीसाठी प्रस्ताव दिला आहे. प्रस्तावानुसार समोरून चर्चेचा प्रस्ताव आल्यास पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.
- संतोष जनाठे, भाजप

पक्षीय बलाबल
बविआ : ११
शिवसेना : ४
राष्ट्रवादी : १
भाजप : १
एकूण : १७