ठाकरेंच्या मेळाव्यात हिंदुत्वाचे विचार सोडून टोमणेच अधिक असणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray
ठाकरेंच्या मेळाव्यात हिंदुत्वाचे विचार सोडून टोमणेच अधिक असणार

ठाकरेंच्या मेळाव्यात हिंदुत्वाचे विचार सोडून टोमणेच अधिक असणार

sakal_logo
By


ठाणे: शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक हिंदुत्ववादी विचारांचे सोने लुटण्यासाठी येत होते. मात्र, यंदाच्या मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार नसतील, तर केवळ टोमणेच अधिक असतील, असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. टेंभीनाका येथील नवरात्रोत्सवाची माहिती देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी म्हस्के यांनी ही टीका केली.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवाजी पार्क येथील दसरा मेळावा कोण घेणार, असा वादंग निर्माण झाला होता. शिवसेनेच्या वतीने २२ ऑगस्ट रोजी शिवाजी पार्क येथील मैदानासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीदेखील शिवाजी पार्क मैदानासाठी ३० ऑगस्ट रोजी अर्ज केला होता. अखेर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनाच कोर्टाने सशर्त परवानगी दिल्यानंतर मुंबई आणि ठाण्यात शिवसैनिकांनी जल्लोष केला.

ठाण्यात सोमवारपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हस्के यांनी ठाकरे गटावर याच मुद्द्यांवरून टीका केली आहे. शिवाजी पार्कसंदर्भात न्यायालयीन लढाई सुरू असून आम्ही कायद्याचा आदर करत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्याची आठवण करून देताना बाळासाहेब ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यासाठी शिवसैनिक हिंदुत्ववादी विचारांचे सोने लुटण्यासाठी येत होते. मात्र आता त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार सोडून टोमणेच अधिक असणार आहेत, असा टोला म्हस्के यांनी लगावला आहे.

आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवाबरोबरच नवरात्रोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात पोहचवला. त्यांनी सुरू केलेली ही उत्सवाची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने पुढे नेली असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. त्यामुळेच नवरात्रोत्सवात स्वतः मुख्यमंत्रीही हजर राहणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.