उल्हासनगरात बोगस डॉक्टरांची झाडाझडती होणार, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात बोगस डॉक्टरांची झाडाझडती होणार,
उल्हासनगरात बोगस डॉक्टरांची झाडाझडती होणार,

उल्हासनगरात बोगस डॉक्टरांची झाडाझडती होणार,

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नसतानाही काही बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करत असून काहींनी स्‍वतंत्रपणे लॅब टाकल्‍या असल्‍याचे निवेदन काँग्रेसने पालिकेला दिले. याची गंभीर दखल घेत उल्हासनगरातील बोगस डॉक्टरांची झाडाझडती घेण्‍यात येईल, असे महापालिकेचे आरोग्य उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.
शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांवर, तसेच अवैधरीत्या सरकारच्या कोणत्याही अटींची पूर्तता न करता लॅब चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय सेलचे प्रदेश समन्वयक डॉ. धीरज पाटोळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी आरोग्य उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी तर खेळत आहेतच, पण दहा वर्षे मेडिकलची प्रॅक्टिस करून रुग्णांना सेवा देणाऱ्या प्रामाणिक डॉक्टरांवरही अन्याय करत असल्‍याचे प्रदेश समन्वयक डॉ. धीरज पाटोळे यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी रुग्णांच्या जीवाशी खेळ थांबवावा, अशी मागणी केली. तसेच शहरातील डॉक्टरांनी व रुग्णांनी समस्यांबाबत वैद्यकीय सेलशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील डॉ. धीरज पाटोळे, रोहित साळवे यांनी केले.
लवकरच कारवाई होणार
यासंदर्भात आरोग्य उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, यापूर्वी काही बोगस डॉक्टरांवर पोलिस ठाण्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. आता निवेदनकर्त्यांकडे असलेल्या बोगस डॉक्टरांविषयीची माहिती घेऊन झाडाझडती घेण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुभाष जाधव यांनी दिली.