
वसईत भात पिकावर ‘बगळ्या’चा शिरकाव
विरार, ता. २५ (बातमीदार) : दोन वर्षांपासून कोरोनामुळे घरात असलेला शेतकरी आता कुठे बाहेर पडला असून आर्थिक संकटातून त्याला बाहेर निघण्यासाठी शेतीचा आधार होता; परंतु यंदा सलग मुसळधार पावसाची बरसात, निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याचा परिणाम भातशेतीवर झाला आहे. आता तालुक्यातील अनेक भागांतील भातरोपांवर बगळ्या रोगाची लागण झाली असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.
सध्या भातपिकांना कणसे भरणीचा मोसम आला असताना तालुक्यात भातपिकांवर विविध भागांत मोठ्या प्रमाणावर बगळ्या रोगाची लागण होऊ लागली असल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत. या रोगामुळे भातरोपावरील कणसासहीत संपूर्ण पाती सफेद पडते. या रोगावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते, मात्र कीटकनाशकांची फवारणी करूनही हा रोग आटोक्यात आणता आला नाही, तर काहींच्या हातून वेळ निघून गेली आहे. याचा परिणाम भात उत्पादनावर होत असून उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यंदा सुरुवातीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांची भात रोपे कुजली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भात लावणी उशिराने केली. या उशिराने करण्यात आलेल्या भात पिकांवर आता बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हजारो रुपयांचे पीक नष्ट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तालुक्यातील भात पिकाचे जुलै महिन्यात आलेल्या पुरात माती-दगड शेतात घुसून नुकसान झाले आहे. यातून शेतकरी सावरत असताना बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडू लागला आहे. भाताच्या पिकावर बगळ्या रोगाने शिरकाव केल्याने शेतकरी चिंतेत आहे. या बगळ्या रोगाने भाताचे शेतात उभे असलेले हिरवेगार पीक पांढऱ्या रंगाचे होऊ लागले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे भात शेतीचे मोठे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आला आहे. आता या भात शेतीवर आलेल्या विविध रोगांमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
==========================================
निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस भात शेती करणे कठीण झाले आहे. तालुक्यात काही ठिकाणी भात पिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उभे हिरवे पीक पांढरे पडू लागले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची चिंता असून धान्याऐवजी हाती केवळ पेंढा शिल्लक राहतो की काय, ही भीती निर्माण झाली आहे.
- निवृत्ती म्हात्रे, शेतकरी