आदिशक्तीच्या आगमनात विघ्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिशक्तीच्या आगमनात विघ्न
आदिशक्तीच्या आगमनात विघ्न

आदिशक्तीच्या आगमनात विघ्न

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २५ (वार्ताहर) ः घटस्थापना, त्याचबरोबर देवीची प्रतिष्ठापना काही तासांवर येऊन ठेपली असताना अद्यापही सिडकोकडून नवरात्रोत्सव मंडळांना जागेचे ना हरकत प्रमाणपत्र दिले गेलेले नाही. त्यामुळे इतर परवानग्यासुद्धा रखडल्याने
गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवातसुद्धा खोडा घालणाऱ्या सिडकोविरोधात मंडळांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पनवेल परिसरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक मंडळांकडून दुर्गा देवीची प्रतिष्ठापना केली जाते. यानिमित्ताने उभारण्यात येणारे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. त्यामुळे नवरात्रीचे वेगळेपण नेहमीच आकर्षण ठरत आहे. सिडको वसाहतीत देखील विविध मंडळांकडून अनेक वर्षांपासून दुर्गा उत्सवाची परंपरा जपली जात आहे. अशातच दोन वर्ष कोरोनामुळे उत्सवातील उत्साहाला ब्रेक लागला असताना यंदा निर्बंधमुक्त सणामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पण या आनंदावर विरजण पेरण्याचे काम सिडकोकडून केले जात असून मंडपासाठीच्या ना हरकत दाखल्यासह इतर परवानग्यांसाठी दिरंगाई होत असल्याने आयोजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
-----------------------------------
वेळखाऊ प्रक्रियेमुळे दिरंगाई
स्थानिक कार्यालयांमध्ये सहाय्यक वसाहत अधिकारी, त्याचबरोबर इंजिनिअरिंग विभाग असा या अर्जाचा प्रवास सुरू होतो. या ठिकाणाहून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ती फाईल बेलापूर येथील वसाहत अधिकारी कार्यालयात जाते. तेथेही दोन ते तीन टेबल फाईल फिरते. त्यानंतर जसा वेळ मिळेल, तसे संबंधित अधिकारी ही प्रक्रिया पूर्ण करत असल्यामुळे विलंब होत आहे.
-------------------------------
अन्य विभागाच्या परवानगीचा खोळंबा
सिडकोने वसाहती फ्री होल्ड केल्या नसल्यामुळे नवरात्रोत्सवाकरीता सिडकोची ना हरकत घेणे क्रमप्राप्त आहे. अंतिम परवानगी ही पनवेल महापालिकेकडून दिली जाते. मनपा प्रशासनाने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. असे असले तरी सिडकोकडून ना हरकत मिळत नसल्याने महापालिकेला मंडळांना परवानगी देता येत नाही. त्याचबरोबर वाहतूक, अग्निशमन दलाच्या एनओसीसुद्धा मिळत नाहीत. त्यामुळे महावितरणकडून तात्पुरती वीजजोडणी दिली जात नाही.
--------------------------------
एनओसीचे सोमवारनंतर पाहू
यासंदर्भात सिडकोचे कार्यकारी अभियंता विलास बनकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण बाहेर आहोत. सोमवारी आल्यानंतर नवरात्रोत्सव मंडळांना ना हरकत देऊ, अशा प्रकारचे उत्तर त्यांनी दिले. देवींची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सिडको ना हरकत देणार असेल तर इतर परवानग्या मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-----------------------------------------
सिडकोच्या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी संधी मिळत आहे. मात्र सिडकोकडून जागेची ना हरकत दिली जात नसल्यामुळे अन्य परवानग्या मिळण्यासाठी विलंब होत आहे.
- सीता पाटील, माजी उपमहापौर, पनवेल