मांगल्‍याची घटस्‍थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांगल्‍याची घटस्‍थापना
मांगल्‍याची घटस्‍थापना

मांगल्‍याची घटस्‍थापना

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २५ : जय दुर्गा, आई भवानीचा जयघोष करत आदिशक्तीचा नऊ दिवस जागर करण्यासाठी ठाणेनगरी सज्ज झाली आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे नवरात्रोत्सवाचा उत्साह वाढला असून गुलाल, फुले उधळत, वाजत गाजत, भव्य मिरवणुका काढत ठिकठिकाणी देवीचे रविवारी आगमन झाले. ठाणे पोलिस आयुक्तालय परिमंडळामध्ये यंदा मूर्ती, प्रतिमा आणि घटांची स्थापना होणार असून सोमवारी विधिवत त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
भक्तांचे संकट दूर करणारी आणि त्यांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या नवरात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. यामध्ये प्रमुख आकर्षण आहे ते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवाचे. प्रसन्न मुद्रा असलेल्‍या आई जगदंबेचे दर्शन घेण्यासाठी यावर्षीही लाखो भाविक गर्दी करणार आहेत. देवीच्या बैठकीसाठी शिखर मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली असून, आतापासूनच परिसराला जत्रेचे रूप येऊ लागले आहे. नऊ दिवस येथे विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. दुसरे आकर्षण म्हणजे कल्याणच्या दुर्गाडी देवीचे. यंदा येथेही मोठ्या उत्साहात देवीचा जागर करण्याचे नियोजन आहे. याशिवाय ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये छोटी-मोठी मंडळेही सज्ज झाली असून, आकर्षक रोषणाई आणि सजावटींनी सार्वजनिक मंडप सजले आहेत. दुसरीकडे शेकडो ठाणेकरांच्या घरी देवी, घटस्थापना होणार आहे.

तीन ठिकाणी रामलीला, आठ ठिकाणी रावण दहन
नवरात्रोत्सवात रामलीला हेही प्रमुख आकर्षण असते. त्याचा आनंदही ठाणेकरांना यंदा लुटता येणार आहे. ठाण्यात दोन, तर भिवंडीमध्ये एका ठिकाणी रामलीलाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे दसऱ्याला होणाऱ्या रावण दहनाचीही परवानगी पोलिस आयुक्तालयाकडे मागण्यात आली आहे. त्यानुसार ठाण्यात दोन, भिवंडीत एक, कल्याण तीन, उल्हासनगर दोन आयोजकांना रावण दहनाची परवानगी देण्यात आली आहे.

देवींचा जागर (सार्वजनिक/ खासगी)
परिमंडळ मूर्ती प्रतिमा घट-गरबा
ठाणे १०९/२३१ ०६/१६ ११/६८४
भिवंडी ८८/१५२ २०/२७ ०४/५७०
कल्याण १३६/१३८ ४३/१८२ २५/७५२
उल्हासनगर ११५/४३१ २२/५६ ०८/११४
वागळे १४६/१३७ २४/६१ १८/१९५३
एकूण ५९४/ १०८९ ११५/३४३ ६६/४०७३

३८ मंदिरांमध्येही उत्सव
नवरात्रोत्‍सवात देवीच्या मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी होते. विशेषतः पंचमी, सप्तमीला देवीची आटी भरण्यासाठी महिला येतात. यावर्षीही ठाण्यातील सुमारे ३८ मंदिरांमध्ये नवरात्रोत्‍सवाचे आयोजन करण्यात आले आहे.